Nashik Crime : वारंवार घर सोडून जाणाऱ्या मुलीसोबत बापाचे धक्कादायक कृत्य... पोलिसांनी निर्दयी पित्याला केली अटक

Nashik Crime : रागाच्या भरात मुलीसोबत केलेल्या कृत्याने निर्दयी पित्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेचा अधिक तपास अंबड पोलीस करत आहेत

Updated: Jan 17, 2023, 03:05 PM IST
Nashik Crime : वारंवार घर सोडून जाणाऱ्या मुलीसोबत बापाचे धक्कादायक कृत्य... पोलिसांनी निर्दयी पित्याला केली अटक title=

सागर गायकवाड, झी मीडिया, नाशिक : रागाच्या भरात एखादी व्यक्ती कधी कोणतं पाऊल उचलेल याचा काही नेम नाही. असाच काहीसा प्रकार नाशिकमध्ये (Nashik Crime News) घडलाय. एका पित्यानेच पोटच्या पोरीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकच्या अंबडमध्ये (ambad) समोर आला आहे. शुल्लक वादातून पित्याने टोकाचे पाऊल उचलत मुलीला संपवलं आहे. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गळा आवळून या निर्दयी बापाने मुलीची हत्या केली आहे.

ज्योती रामकिशोर भारती (वय 24) असे हत्या झालेल्या मुलीचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. नाशिकच्या अंबड परिसरातील एक्सलो पॉईंट येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. ओढणीने गळा आवळून रामकिशोर भारती याने ज्योतीची हत्या केली. हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपास करत पोलिसांनी आरोपी रामकिशोर भारती याला ताब्यात घेतले आहे.

घरात होणाऱ्या किरकोळ वादातून ज्योती वारंवार घर सोडून जात होती. ज्योतीकडून सातत्याने हा प्रकार सुरु असल्याने रामकिशोर भारती याला राग अनावर झाला. याच रागातून रामकिशोर भारती याने ज्योतीचा ओढणीने गळा आवळून खून केला, अशी माहिती सुरुवातीला समोर आली होती. मात्र पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

धक्कादायक माहिती समोर

ज्योतीचे प्रेम संबंध मान्य नसल्याने रामकिशोर भारती याने मुलीचा खून केल्याचे समोर आले आहे. अंबड लिंक रोड चुंचाळे परिसरातील रामकृष्ण नगर भागात राहणाऱ्या रामकिशोर भारती यांच्या मुलीचे एका मुलाशी प्रेम संबंध होते. मुलीचे हे प्रेम संबंध रामकिशोर यांना मान्य नव्हते. यामुळेच ज्योती वारंवार आपल्या प्रियकरासोबत पळून जात होती. त्यामुळे रामकिशोर आणि त्यांच्या मुलीचे वारंवार भांडण होत होते. 

मंगळवारी देखील संशयित रामकिशोर आणि मुलगी ज्योती हिचे भांडण झाले. या भांडणात रामकिशोर यांना राग अनावरण झाल्याने त्यांनी ओढणीच्या साहाय्याने ज्योतीचा गळा आवळून तिची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगिरथ देशमुख यांच्यासह अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी याप्रकरणी रामकिशोर भारती याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु केला आहे.