डुक्करांना पकडणाऱ्या पथकाच्या सुरक्षेसाठी पोलीस तैनात

शहरातल्या मोकाट डुकरांना पकडण्यासाठी महापालिकेनं तामिळनाडूतून एक डुक्कर पकडणाऱ्या पथकाला बोलवलंय

Updated: Jul 23, 2019, 10:37 AM IST
डुक्करांना पकडणाऱ्या पथकाच्या सुरक्षेसाठी पोलीस तैनात title=
फाईल फोटो

अमर काणे, झी २४ तास, नागपूर : नागपूर पोलिसांवर सध्या एक नवी जबाबदारी देण्यात आलीय. घरचं झालं थोडं आणि जावयानं धाडलं घोडं, अशी परिस्थिती नागपूर पोलिसांची झालीय. शहरातल्या मोकाट डुकरांना पकडण्यासाठी महापालिकेनं तामिळनाडूतून एक डुक्कर पकडणाऱ्या पथकाला बोलवलंय... आणि आता या पथकाच्या सुरक्षेसाठी पोलीस तैनात करण्यात आलेत.

नागपुरात सुमारे दहा हजार मोकाट डुकरं आहेत. त्याकरता महापालिकेनं ही डुक्करं पकडण्यासाठी अनेक एन्जसीकडे विचारणा केली. मात्र नागपुरात डुकरं पाळणाऱ्यांमध्ये अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक आहेत. त्यामुळे कुणीच हे काम स्वीकारायला तयार नव्हतं. अखेर थेट तामिळनाडूहून डुक्कर पकडणाऱ्या पथकाला बोलवावं लागलं. 

के टी नगर परिसरात अवघ्या काही मिनिटांत ५० पेक्षा जास्त डुकरं जेरबंद करण्यात आली. मग डुक्कर पाळणारे भडकले आणि या पथकावर धावून गेले... अखेर पोलिसांनी मध्यस्थी केल्यावर डुकरांवरुन सुरू झालेलं हे युद्ध थांबलं. पण नागपुरातली गुन्हेगारी एवढी वाढलेली असताना डुकरं पकडायला पोलीस कशासाठी? असा सवालही नागपूरकर करत आहेत.