मराठा आरक्षण आंदोलन काळात मुलगी झाली, दाम्पत्याने मुलीचं नाव ठेवलं...

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी राज्यात ऐतिहासिक आंदोलन झालं.  या मराठा आरक्षण आंदोलनाची आठवण म्हणुन नांदेड जिल्ह्यातील एका दाम्पत्याने आपल्या मुलीचं अनोखं नाव ठेवलं आहे. 

सतिश मोहिते | Updated: Nov 4, 2023, 05:07 PM IST
मराठा आरक्षण आंदोलन काळात मुलगी झाली, दाम्पत्याने मुलीचं नाव ठेवलं... title=

सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड : राज्यात मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आरपारची लढाई सुरु आहे. जालन्याच्या अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरु केल्यानंतर राज्यभरातून मराठा समाजाने त्यांना पाठिंबा दिला. आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर सरकारला 2 महिन्यांची मुदत देत जरागेंनी उपोषण मागे घेण्याची घोषणा केली. पण मराठा समाजाला 2 जानेवारीपर्यंत सरसकट टिकणारे आरक्षण न दिल्यास मराठे मुंबईत धडकतील असा इशाराही त्यानी दिला आहे . 

आरक्षण आंदोलन काळात मुलगी झाली
दरम्यान, नांदेड (Nanded) जिल्हयातील अर्धापूर तालुक्यातील शेलगाव इथल्या आतम राजेगोरे यांचा मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनात सक्रिय सहभाग होता. जरांगे पाटलांना पाठींबा म्हणुन आतम राजेगोरे गावात उपोषणावर बसले होते. गेल्या सोमवारी 30 ऑक्टोबर रोजी त्यांचं उपोषण सुरू असताना पत्नी गायत्री हीने मुलीला जन्म दिला. मराठा आरक्षण आंदोलन काळात मुलीचा जन्म झाल्याने या दांपत्याने आपल्या मुलीचे नाव 'आरक्षणा' असं ठेवलं आहे. मराठा आरक्षणासाठी कधी नव्हे असे ऐतिहासिक आंदोलन झाले. या मराठा आरक्षण आंदोलनाची आठवण म्हणुन आपल्या मुलीचे नाव 'आरक्षणा' ठेवल्याचे आतम राजगोरे यांनी सांगितलं.

देवेंद्र फडणवीस यांचा मास्टरस्ट्रोक
मराठा आरक्षणासाठीचं उपोषण जरांगेंनी मागे घेण्यात उपमुख्यमंत्री फडणवीसांचा (DCM Devendra Fadanvis) मास्टरस्ट्रोक असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. जरांगेंसोबत चर्चेसाठी दोन माजी न्यायमूर्ती पाठवण्याचा निर्णय फडणवीसांनीच घेतल्याची माहितीही सूत्रांनी दिलीय.  जरांगेंच्या काही मागण्यांना उत्तर देणं सरकारला शक्य नव्हतं. तेव्हा कायदेशीर बाबींचा गुंता सोडवण्यासाठी कायदे क्षेत्रातल्याच जाणकारांना पाठवणं संयुक्तिक ठरेल असा विचार फडणवीसांनी सर्वांसमोर ठेवल्याचं सूत्रांनी म्हटलंय. मारोती गायकवाड आणि सुनील शुक्रे या दोन माजी न्यायमूर्तींचं नाव फडणवीसांनी दिल्याचं सूत्रांनी म्हटलंय.  या दोघांना जरांगेसोबत चर्चेसाठी पाठवण्याच्या फडणवीसांच्या कल्पनेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही उचलून धरल्याचं समजतंय. या दोन्ही न्यायमूर्तींनी अतिशय योग्यप्रकारे विषयांची मांडणी केल्यानं तिढा सुटल्याचं सूत्रांनी सांगितलं. तेव्हा पुन्हा एकदा संकटाच्या काळात फडणवीसच धावून आल्याचं चित्र दिसतंय.

मनोज जरांगेंवर वैद्यकीय उपचार
मनोज जरांगेंना वैद्यकीय उपचारांसाठी मुंबईत हलवण्याची शक्यता आता मावळली आहे.. जरांगेंनी मुंबईत वैद्यकीय उपचार करुन घेण्यासाठी नकार दिलाय. सध्या जरांगेंवर छत्रपती संभाजीनगरमधल्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जरांगेंच्या लिव्हरला आणि किडनीला सूज आली आहे. 9 दिवसांपासून जरांगेंचं उपोषण सुरु होतं. यादरम्यान जरांगेंनी पाणी किंवा अन्नही घेतलेलं नव्हतं. त्याचे परिणाम त्यांच्या शरीरावर झाले आहेत.. सध्या त्यांना सलाईनवर ठेवण्यात आलंय.  तेव्हा पुढील उपचारासाठी जरांगेंना मुंबईतल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्याच्या हालचाली सुरु होत्या. मात्र जरांगेंनीच त्याला ठाम नकार दिलाय.