नाना पटोले हे जातीयवादी प्रचार करत असल्याचा आरोप

नागपुरात नितीन गडकरींसमोर नाना पटोले यांचं आव्हान.

Updated: Apr 10, 2019, 01:59 PM IST
नाना पटोले हे जातीयवादी प्रचार करत असल्याचा आरोप title=

नागपूर : नागपुरातले काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्याकडून जातीयवादी प्रचार केला जात असल्याचा आरोप होतो आहे. नागपुरात भाजप उमेदवार नितीन गडकरीं विरुद्ध काँग्रेसकडून नाना पटोले अशी लढत होत आहे. गडकरींविरुद्ध लढताना काँग्रेसनं अगदी सुरुवातीपासूनच जातीय समिकरणांची जुळवाजुळव केली. आता काँग्रेस उमेदावर नाना पटोले यांच्या समर्थनात सोशल मीडियावर जातीयवादी पोस्ट टाकण्यात येत आहेत. याआधी गडकरींविरुद्ध काँग्रेसकडून आधी दलित-मुस्लीम-कुणबी असा डीएमके पॅटर्न प्रचारात राबवण्यात आला होता. ११ एप्रिलला येथे मतदान होणार आहे.

नागपूरमध्ये नितीन गडकरी आणि नाना पटोले यांच्यात थेट लढत आहे. नाना पटोले यांनी २०१४ मध्ये भाजपकडून निवडणूक लढवली होती आणि ते विजयी देखील झाले होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा काँग्रेसचा रस्ता धरला. नितीन गडकरी हे मोदी सरकारमधील सर्वात सक्रीय आणि कार्यक्षम मंत्री आहेत. त्यांचं नाव पंतप्रधानपदासाठी देखील चर्चेत आलं होतं. देशभरात रस्त्यांच्या कामाचा धडाका त्यांनी लावला आहे. त्यामुळे त्यांना विजयाचा पूर्ण विश्वास आहे. 

दुसरीकडे नाना पटोले यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी टीका केली. 'नाना पटोले यांनी इतक्या वर्षात एकतरी प्रकल्प मतदारसंघात आणला का असा सवाल त्यांनी केला आहे.'

नाना पटोलेंनी भाजपमधून राजीनामा दिल्यानंतर पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे येथून विजयी झाले. आता भंडारा-गोंदियाची जागा परत मिळवण्यासाठी भाजपने सुनील मेंढे यांना उमेदवारी दिली आहे. तर याच मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून नाना पंचबुद्धे मैदानात आहेत.