'भगवानबाबांच्या दर्शनाला या', नामदेव शास्त्री धनंजय मुंडेंच्या भेटीला

 धनंजय मुंडे यांना भगवानबाबांच्या समाधीच्या दर्शनास येण्याचे निमंत्रण 

Updated: Dec 13, 2019, 11:34 PM IST
'भगवानबाबांच्या दर्शनाला या', नामदेव शास्त्री धनंजय मुंडेंच्या भेटीला  title=

बीड : बीडमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचा सत्तासंघर्ष विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्राने पुन्हा एकदा पाहीला. नुकतेच 'गोपीनाथ गडा'वर पंकजा मुंडे यांनी शक्तीप्रदर्शन केले. या पार्श्वभुमीवर नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी धनंजय मुंडे यांना भगवानबाबांच्या समाधीच्या दर्शनास येण्याचे निमंत्रण दिले आहे. धनंजय मुंडे यांनी ट्वीट करुन यासंदर्भात माहिती दिली. या भेटीचा राजकीय अर्थ काढला जात असून पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. 

स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांसाठी भगवानगड हा ऊर्जास्रोत राहीला आहे. धनंजय मुंडे यांना काही वर्षांपूर्वी राजकीय हेव्यादेव्यांमुळे भगवान गडावर येण्यास मज्जाव करण्यात आला होता. परंतु  नामदेव शास्त्री यांनीच धनंजय मुंडे यांची भेट घेत त्यांना निमंत्रण दिले आहे. 

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या भगवान गडावर नामदेव शास्त्री यांनी राजकीय भाषणास बंदी घातल्याने गडावरून राजकीय वादंगाचे काहूर माजले होते. पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्री यांच्यातील वाद शिगेला पोहोचला होता. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणासाठी गोपीनाथ गडाची निवड केली. दरवर्षी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या वाढदिवसाला त्या इथूनच मुंडे समर्थकांना संबोधित करतात. 

विरोधी पक्षात असणारे धनंजय मुंडे हे आमदार होऊन सत्तेत आले आहेत. त्यामुळे बीडमधील समीकरणंही वेगाने बदलली आहेत. 'संत येती घरा तोचि दिवाळी दसरा' अशा शब्दात नामदेव शास्त्री यांनी मुंडेंना 'आज्ञा' केली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे जुनं सारं विसरुन हे निमंत्रण स्वीकारणार का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.