मुंबई : नागपुरात आज पुन्हा एकदा नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. नागपूर जिल्ह्यात आज पहिल्यांदाच ४ हजार कोरोनाबाधितांची (Nagpur Corona) भर पडली आहे. गेल्या आठवड्याभरापासून नागपूर जिल्ह्यात दररोज ३ हजाराहून नव्या रुग्णांची वाढ होत होती. आज तर त्याच्याही पुढे जाऊन नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
नव्या ४ हजार ९५ रुग्णांमध्ये शहरात २ हजार ९६६ तर ग्रामीण भागात १ हजार १२६ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे शहरी भागात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त पाहायला मिळतोय.
दुसरीकडे नागपुरातील कोरोनाग्रस्तांचे मृत्यू, हा ही मोठा चिंतेचा विषय बनलाय. कारण आज नागपूर जिल्ह्यात ३५ कोरोनाग्रस्तांनी (Nagpur corona death) आपला जीव गमावला आहे. यामध्ये शहरात १८ तर जिल्ह्यातील १४ तर जिल्ह्याबाहेरील ३ मृतांचा समावेश आहे. काल नागपुरात ४८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता.
नागपुरात आज १ हजार ९४३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र कोरोनामुक्तांपेक्षा कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण जास्त असल्याने नागपुरातील कोरोनाची स्थिती मोठी डोकेदुखी होऊन बसली आहे. देशात सर्वाधिक अॅक्टीव्ह रुग्णांच्या यादीत नागपूर दुसरा जिल्हा आहे.
याशिवाय वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता नागपुरात आता सण-उत्सवांवरही मर्यादा येऊ लागल्या आहेत. नागपुरात होळी, धुलिवंदन आणि शब ए बारातच्या पार्श्वभूंमीवर निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. यासाठीची नवी नियमावली जाहीर करण्यात आलीय. 28 आणि 29 मार्चला खासगी किंवा सार्वजनिक ठिकाणी उत्सव साजरे करण्यास मनाई करण्यात आलीय.
मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आलीय. दर 29 मार्चला खासगी आणि शासकीय कार्यालयं बंद राहतील. याकाळात सर्व दुकानं, हॉटेल्स बंद राहतील, केवळ किराणा, भाजपीपाला, मटण आणि मांस विक्रीच्या दुकानांना दुपारी एक पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.