Video : 'शर्म आती है की नही...'; नजरेचा धाक अन् शब्दांचा मार देत नागपुरात पोलीस आयुक्तांकडून तडीपार गुन्हेगारांची शाळा

Nagpur News : मागील काही दिवसांपासून नागपुरात वाढलेली गुन्हेगारी पाहता आता या गुन्हेगारी प्रवृत्तीला चाप बसवण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.   

सायली पाटील | Updated: Feb 9, 2024, 09:09 AM IST
Video : 'शर्म आती है की नही...'; नजरेचा धाक अन् शब्दांचा मार देत नागपुरात पोलीस आयुक्तांकडून तडीपार गुन्हेगारांची शाळा  title=
Nagpur news CP Ravindra Singal took Criminal Parade watch video

Nagpur News : काही दिवसांपूर्वी (Pune News) पुण्यातील पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी नोंद असणाऱ्या गुन्हेगारांना बोलवून त्यांची ओळख परेड घेतली. जिथं त्यांनी गुन्हेगारी कृत्य न करण्याची तंबी तिथं हजर असणाऱ्या प्रत्येकालाच दिली. ज्यानंतर आता नागपुरातही असंच चित्र पाहायला मिळालं. जिथं नवनियुक्त पोलीस आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यानंतर ही धडक कारवाई केली आणि नोंद असणाऱ्या 137 गुन्हेगारांची ओळख परेड घेत त्यांची शाळा घेतली. नजरेचा धाक आणि शब्दांचा मार देत नागपुरचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनी गुन्हेगारांना इथून पुढं एकही दुष्कृत्य न करण्याचं बजावत परत पाठवलं आहे. 

गेल्या काही दिवसांपासून नागपुरात खून, दुहेरी खुन, धमकी, खंडणी या आणि अशा काही घटनांमध्ये प्रचंड वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. गुन्हेगारी प्रवृत्ती पुन्हा सक्रिय होत असल्याचं पाहून त्यांच्यावर वचक ठेवण्यासाठी म्हणून रवींद्र सिंघल यांनी तातडीनं गुन्हेगारांना आयुक्तालयात बोलवून त्यांची ओळख परेड घेतली. ज्यामध्ये शहरातील मकोका, खून, हल्ला, एनडीपीएस, खंडणी अशा गुन्ह्यांप्रकरणी सक्रिय असणाऱ्या गुन्हेगारांना बोलवत त्यांच्या गुन्ह्यांचा पाढा आयुक्तांनी वाचून दाखवला. 

हेसुद्धा वाचा : Video: 'ए मारणे, समजलं का? नेत्यांसोबतचे फोटो...'; पुणे पोलीस आयुक्तांचा गुंडांना दम

 

'शरम आती है की नही...' अशा शब्दांत गुन्हेगारांना खडसावत आणि त्यांच्याकडूनच त्यांचे गुन्हे वदवून घेताना इथून पुढं एकही गुन्हा घडल्यास यंत्रणेकडून कठोरातील कठोर शिक्षा दिली जाईल अशी तंबीच दिली. यावेळी सिंघल यांनी प्रत्येक गुन्हेगाराची माहिती, त्यांच्या नावे असणारे गुन्हे आणि गुन्हेगारांची सद्यस्थिती, त्यांची कामं या साऱ्याचीच माहिती मिळवली. यावेळी त्यांनी अवैध सावकारीतून घडणाऱ्या गुन्ह्यांवर लक्ष केंद्रीत करत या गुन्ह्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांची खैर नसून त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई केली जाईल असाही थेट इशारा दिला. 

सिंघल यांच्याकडून हे सक्तीचे शब्द सुनवले जात असतानाच एका रांगेत गुन्हेगार त्यांच्यापुढं येऊन मान खाली ठेवून गुन्हे कबूल करत स्वत:ची माहिती देत होते. यामध्ये काही गुन्हेगार तडीपारही असल्याचं यंत्रणेकडून पोलीस आयुक्तांना सांगण्यात आलं. दरम्यान, सिंघल यांच्याकडून घेण्यात आलेल्या गुन्हेगारांच्या या परेडची चर्चा पोलीस यंत्रणेसोबतच संपूर्ण नागपुरात चर्चेचा विषय ठरली.