जितेंद्र शिंगाडे,झी मीडिया, नागपूर : गरीब,गरजू व होतकरू विद्यार्थांना शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी नागपूर महापालिकेने वाचनालयाची निर्मिती केली... मात्र आता या वाचनालयाची पार दुरवस्था झालीये.. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे इथं अभ्यासाला येणाऱ्या विद्यार्थांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागतंय..
नागपूर शहरातील मोठ्या आणि महत्वाच्या वाचनालयापैकी एक म्हणून डॉक्टर राममनोहर लोहिया वाचनालयाची ओळख आहे. १९७२ मध्ये नागपूर महानगर पालिकेने उत्तर नागपुरातील आकाशनगर येथे या वाचनालयाची निर्मिती केली. हे वाचनालय २४ तास सुरु असतं. वाचनालयात मुलींसाठी दोन आणि मुलांसाठी दोन सभागृह आहेत. मात्र विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या वाचनालयाची दुरवस्था झाली आहे. विशेष म्हणजे वाचनालयात पिण्याचे पाणीही नाही. दुषित पाण्यामुळे अनेकदा विद्यार्थी आजारी पडत असल्याचे विद्यार्थी सांगतात.
केवळ पाण्याचीच समस्या नाही तर स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेली पुस्तके देखील कालबाह्य झालेली आहेत.. त्यामुळे विद्यार्थांना स्वतः पुस्तके खरेदी करावी लागतात. वारंवार तक्रारी करुनही पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे अखेर या विद्यार्थ्यांनी झी हेल्पलाईनची मदत घेतली.
विद्यार्थ्यांची तक्रार येताच झी हेल्पलाईनच्या टीमनं या वाचनालयाला भेट दिली. हे वाचनालय म्हणजे समस्यांचं आगर होतं. स्वच्छता गृहांचा प्रश्नही गंभीर होता. स्वच्छतागृहात नळ नाही, त्यामुळे बाहेरून पाणी आणावे लागते. मुलींकरिता येथे केवळ १ स्वच्छतागृह आहे. वाचनालयात बेवारस कुत्र्यांचा वावर आहे. तर मुलींच्या वाचनालयाच्या पहिल्या मजल्यावर बंद कुलर आणि टाकाऊ वस्तू साठवून ठेवल्यात. वाचनालयातील अनेक लाईट, पंखे बंद आहेत. झी हेल्पलाईननं वाचनालयाच्या या दुरावस्थेबाबत स्थानिक नगरसेवकांना विचारणा केली.. महापालिका प्रशासन या प्रकाराला जबाबदार असल्याचं त्यांनी सांगीतलं. विद्यार्थांच्या या समस्येवर महापालिकेका प्रशासनाचे लक्ष वेधून पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिलं आहे.
झी हेल्पलाईननं उपमहापौरांच्या कानावरही वाचनालयाची समस्या घातली. त्यांनी यावर लवकरच तोडगा काढून विद्यार्थांना सर्व सोयी सुविधा पुरवण्यात येतील असं आश्वासन दिले.