Nagpur Bank ATM 600 Rs Extra Cash: एटीएममधून पैसे काढताना कमी पैसे निघाले, कार्ड अडकले किंवा फाटक्या नोटा मिळणे यासारख्या बातम्या तुम्ही यापूर्वी वाचल्या किंवा ऐकल्या असतील. खरं तर असे प्रकार वरचेवर होत असतात. मात्र नागपूरमध्ये एक अगदीच उलटा प्रकार घडला आहे. येथील एका एटीएममधून दर हजार रुपयांमागे 600 रुपये अधिक मिळत होते. त्यामुळे या एटीएममधून पैसे काढण्यासाठी नागपूरकरांनी भली मोठी रांग लावल्याचं चित्र पाहायला मिळालं.
झालं असं की, नागपूरमधील खापरखेडा येथील अॅक्सेस बँकेच्या एटीएममध्ये हा विचित्र प्रकार घडला. येथे पैसे काढायला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक ट्रानझॅक्शनमागे 600 रुपये अतिरिक मिळत होते. म्हणजे हजार रुपये काढल्यास 1600 आणि 500 रुपये काढल्यास 1100 रुपये एटीएम मशीनमधून बाहेर पडत होते. ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर या एटीएममधून पैसे काढण्यासाठी मोठी गर्दी केली. सदर घटना 5 सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारस घडली. अनेकांनी या तांत्रिक बिघाडामुळे झालेल्या गोंधळाचा फायदा घेतला.
हा सारा प्रकार समोर आल्यानंतर तपासणी केली असता या एटीएम केंद्रावरील मशिनमध्ये पैशांच्या ट्रेमध्ये नोटा भरताना तांत्रिक चूक झाल्याने अशाप्रकारे अतिरिक्त पैसे बाहेर पडत होते असं सांगितलं जात आहे. खापरखेडा येथील स्थानिक नागरिक असलेल्या अरुण महाजन यांना हा सगळा प्रकार लक्षात आल्यावर त्यांना तातडीने स्थानिक पोलिसांना कळवलं. तसेच अरुण महाजन यांनी संबंधित बँकेलाही घडत असलेला प्रकार कळविल्यावर एटीएम दुपारी बंद करण्यात आलं. त्यानंतर झालेली तांत्रिक चूक दुरुस्त करण्यात आली.
नक्की पाहा >> कंटेनर हॉटेलमध्ये घुसवण्याचा प्रयत्न! जोरदार धडक अन्..; पुण्यातील धक्कादायक Video
मात्र हा गोंधळ लक्षात येऊन बँकेने चूक दुरुस्त करेपर्यंत या एटीएममधून सुमारे 3 लाखांपेक्षा अधिक रुपये अतिरिक्त पैसे म्हणून निघून गेल्याचं समोर आलं आहे. दुपारी एटीएम बंद करत दुरुस्तीनंतर संध्याकाळी 7 वाजता एटीएम सुरू करण्यात आलं. एका नागरिकाने हा सगळा प्रकार वेळीच लक्षात आणून दिला नसता तर यामध्ये आणखी फटका हा बँकेला बसला असता.
सामान्यपणे अशाप्रकारे अतिरिक्त पैसे गेले असतील तर संबंधित एटीएममधून त्या वेळेत कोणत्या कार्डवरुन पैसे काढण्यात आले आणि किती पैसे काढले गेले याची नोंद बँकेकडे असते. अशा तांत्रिक चुकीच्या काळात काढलेल्या पैशांमधून हे अतिरिक्त पैसे खात्यावरुन कमी केले जातात. विड्रॉअल अॅडसेटमेंट असं या तडजोडीला म्हटलं जातं. अशी तडजोड केल्यास संबंधित खातेदाराला मेसेजच्या माध्यमातून त्यासंदर्भातील माहिती दिली जाते. काही वेळेस असा प्रसंगी सीसीटीव्ही फुटेजही तपासले जातात.