Nagpur Hit And Run Case: नागपूर हिट अँड रन केसप्रकरणात गेल्या काही दिवसांपासून धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. संपत्तीसाठी सासऱ्यांची सुनेने हत्या केली आहे. सुनेने पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या हत्येची सुपारी दिली होती. अपघाताचा बनाव रचत त्यांची बत्या करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी अर्चना पुट्टेवार यांना अटक करण्यात आली आहे. त्यावेळी त्याची सखोल चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
संपत्तीसाठी सासर्यांची अपघाताचा बनाव करून हत्या घडवणाऱ्या अर्चना पुट्टेवार यांना सासरे पुरुषोत्तम पुट्टेवार जादूटोण्याचा वापर करतात असा संशय होता. अर्चना पुट्टेवार यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे सासरे पुरुषोत्तम पुट्टेवार खूप धार्मिक वृत्तीचे होते, ते अति जास्त पूजा पाठ करायचे, ते जादूटोणाचाही वापर करायचे असा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे माझ्या कुटुंबात काही जणांचा अकाली मृत्यू झाला, असा दावा अर्चना यांनी केला आहे.
अर्चना पुट्टेवार यांचा एक भाऊ आणि बहीण या दोघांचे काही वर्षांपूर्वी अकाली मृत्यू झाले होते. त्या संदर्भातच अर्चना पुट्टेवारच्या मनात सासर्यांच्या हेतू बद्दल संशय होता, असं पोलिस चौकशीत समोर आले आहे.
पुरुषोत्तम पुट्टेवार यांची अपघाताच्या माध्यमातून हत्या करण्यात आली. त्यासाठी पुट्टेवार यांच्या सुनेने आपल्या ड्रायव्हर मार्फत सचिन धार्मिक आणि नीरज निमजे यांना हत्येची सुपारी दिली होती. मारणाऱ्याला 1 कोटी सोबतच बारचे लायसन्स आणि बारसाठी जागा देण्याचे देखील आमिष दिले होते. नागपूरच्या बालाजी नगर परिसरात झालेल्या हिट अँड रण प्रकरणी पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा 22 मे रोजी अपघातात घटनास्थळी मृत्यू झाला होता. तपासात मात्र तो अपघात नसून त्यांना सुपारी देऊन चिरडण्यात आल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं होतं.
पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा हिट अँड रन सुपारी किलिंग प्रकरणात पोलिसांनी सूक्ष्म ,लघु व मध्यम उद्योग विभागाचे संचालक (एमएसएमई) प्रशांत पार्लेवर यांनाही अटक केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात गडचिरोली नगर विकास सहाय्यक संचालक असलेल्या या प्रकरणातील मास्टरमाईंट अर्चना पुट्टेवार यांच्यासह त्यांचा चालक सार्थक बागडे, नीरज निमजे, व सचिन धार्मिक यांनाही अटक केली आहे. तसेच अर्चना पट्टेवार हिच्या खाजगी स्वीय सहाय्यक पायल नागेश्वर हिलाही पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी अजून काहीजण पोलिसांच्या रडावर असून त्यांनाही लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.