धक्कादायक! मृत्यूनंतर 'त्याने' फेसबूकवरून दिली जीवे मारण्याची धमकी

सोशल मीडियावरून एखाद्याला धमकी देणे हा कायद्याने गुन्हा आहे.

Updated: Sep 17, 2018, 09:44 PM IST
धक्कादायक! मृत्यूनंतर 'त्याने' फेसबूकवरून दिली जीवे मारण्याची धमकी  title=

जितेंद्र शिंगाडे, प्रतिनिधी, झी मीडिया, नागपूर : सोशल मीडियावरून एखाद्याला धमकी देणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्यातही जर कुणाला जीवे मारण्याची धमकी देणे हा तर गंभीर गुन्हा आहे. मात्र आरोपीला  जीवे ठार मारण्याची धमकी आणि तेही मृत्यूनंतर कुणी देत असेल तर.? असाच प्रकार नागपुरात समोर आलाय.

३ सप्टेंबरला प्रताप नगर पोलीस स्टेशन हद्दीतील लोखंडे नगर मध्ये राहणारा प्रवीण उर्फ पप्पू वंजारी याचा खून करण्यात आला होता. धारदार शस्त्राने वार केल्याने प्रवीणचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी २० वर्षीय शुभम वानखेडे व २५ वर्षीय योगेश सवईवार यांना अटक केली. मुख्य आरोपी शुभम हा मृत प्रवीणचा सख्खा भाचा आहे. मालमत्तेच्या कारणास्तव आरोपी व मृत प्रवीण मध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद होता. याच वादातून शुभमने त्याच्या साथीदारासह प्रवीण वंजारीचा खून केला.

मृत प्रवीण वंजारी याचे एक फेसबूक अकौंट अजूनही सुरु आहे. मृत्यूच्या चार दिवसांनी ७ सप्टेंबरला मृत प्रवीण वंजारीच्या फेसबूक वॉलवर आरोपी शुभमच्या नावे एक धमकीचा मेसेज आला. यात त्याने खुनाचा बदला घेण्याची भाषा वापरली आहे. प्रवीणच्या मृत्यू नंतर त्याचे फेसबूक अकाऊंट वापरून जीवे मारण्याची धमकी देणे हा गंभीर गुन्हा असल्याचे सायबर तज्ज्ञ सांगतात.

प्रवीण वंजारी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. घरफोडी, चोरी, मारहाण यासारखे विविध १६ गुन्हे त्याच्यावर दाखल होते. त्याची हत्या करणाऱ्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या प्रवीण वंजारीचे अनेक गुन्हेगारांशी संबंध होते. त्यापैकीच ज्याच्याकडे या अकाउंटचा पासवर्ड आहे अशी  कुणीतरी प्रवीणच्या फेसबुकचा वापर करत ही धमकी दिल्याचा संशय आहे. त्यामुळे भविष्यातील गॅंगवॉर टाळण्यासाठी फेसबुकवरील या धमकीचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे आहे.