पोलीस हवालदाराने डीपीमध्ये हात घालत स्वतःला संपवलं; धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद

Nagpur News : नागपुरच्या पेन्शननगरमध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. नागपूर पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पंधरा वर्षे लष्करात सेवा दिल्यानंतर पोलीस दलात ही व्यक्ती काम करत होते. गेल्या काही दिवसांपासून तणावात असल्याने पोलीस कर्मचाऱ्याने हे पाऊल उचलल्याचे बोललं जात आहे.

आकाश नेटके | Updated: Jun 27, 2023, 10:36 AM IST
पोलीस हवालदाराने डीपीमध्ये हात घालत स्वतःला संपवलं; धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद title=

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : रोहित्राला ( Double Pole Switch) कवेत घेत एका पोलिसाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुरातील (Nagpur Crime) पेन्शन नगर परिसरात घडलीय. धक्कादायक बाब म्हणजे पहिल्या प्रयत्नात मृत्यू न झाल्याने या पोलीस कर्मचाऱ्याने पुन्हा डीपीमध्ये हात घातला आणि मृत्यूला कवटाळं. या घटनेचा थरार सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरात कैद झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Nagpur Police) घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे.

काशिनाथ कराडे असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असल्याचे समोर आले आहे. पंधरा वर्षे लष्करात सेवा दिल्यानंतर 2019 मध्ये काशिनाथ पोलीस दलात दाखल झाले होते. सध्या पोलीस मुख्यालयात ते तैनात होते. काही दिवसांपासून तणावात असताना सोमवारी दुपारी ते घराबाहेर आले आणि घरापासून काही अंतरावर असलेल्या रोहित्राला त्यांनी कवेत घेतले. विजेचा झटका लागून त्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी गिट्टीकरण पोलीस पुढील तपास करीत आहे.

काशिनाथ भगवान कराडे हे पोलीस मुख्यालयात तैनात होते. त्याच भागात ते भाड्याने खोली घेऊन राहत होते. मुळचे सातारा जिल्ह्यातील कराडवाडी खंडाळा येथील रहिवासी असलेले काशीनाथ कराडे हे आधी भारतीय लष्करात होते. पंधरा वर्षे लष्करात सेवा दिल्यानंतर 2019 मध्ये ते पोलीस दलात हवालदारपदी नियुक्त झाले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून ते तणावाखाली असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र रविवारी दुपारी काशिनाथ कराडे अचानक घरातून निघाले आणि रामदेवबाबा मेडिकल कॉलेजच्या पाठीमागे असलेल्या डीपीजवळ पोहोचले.

डीपीजवळ पोहोचताच त्यांनी आधी दरवाजा उघडला आणि कराडे बाजूला झाले. त्यानंतर थोड्यावेळाने पुन्हा ते डीपीजवळ गेले आणि त्यांनी थेट त्यात हात घातला. यामुळे त्यांना वीजेचा सौम्य झटका बसला. मात्र त्यातून ते बचावले आणि खाली कोसळले. पहिला प्रयत्न फसल्यानंतर कराडे पुन्हा उठले आणि त्यांनी पुन्हा डीपीमध्ये हात घातला. पण यावेळी त्यांना वीजेचा तीव्र झटका बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा सगळा प्रकार तिथे असलेल्या एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच गिट्टीखदान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गिट्टीखदान पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मात्र, कराडे यांनी आत्महत्या का केली याचे नेमके कारण समजू शकले नाही. गेल्या काही कराडे हे काही दिवसांपासून तणावात होते. त्याच तणावातून त्यांनी आत्महत्या केली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे.