मारायला गेले भटके कुत्रे... पण तीन वाघांचा हकनाक बळी!

२०१९ या वर्षाच्या अवघ्या काही महिन्यात ६३ वाघांचा मृत्यू झाल्याचं समोर येतंय

Updated: Jul 9, 2019, 07:17 PM IST
मारायला गेले भटके कुत्रे... पण तीन वाघांचा हकनाक बळी! title=

आशिष अंबाडे, झी २४ तास, चंद्रपूर : जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात मृतावस्थेत आढळलेल्या वाघांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलंय. चंद्रपूरच्या चिमूर तालुक्यातील मेटेपार गावातल्या शेतात तीन वाघ मृतावस्थेत आढळले होते. एकाच ठिकाणी तीन वाघांचा मृत्यू हे धक्कादायक असल्याने वनविभागाने संपूर्ण यंत्रणा तपासासाठी कामाला लावली. मृत वाघीण आणि तिच्या दोन बछड्यांचं शवविच्छेदन केल्यानंतर यात धक्कादायक बाब समोर आली... विषबाधेने वाघांचा मृत्यू झाल्याचं उघड झालं.

मेटेपार गावात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला होता. ही कुत्री जनावरं मारत असल्याची कुजबूज ऐकायला मिळाली. याचा तपास केला असता वनविभागाच्या पथकाने एका शेतकऱ्याला ताब्यात घेतलं.

याच शेतकऱ्यानं वासराच्या मृतदेहात थिमेट नावाचे विष टाकून कुत्र्यांना संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र या भागात फिरणाऱ्या वाघीण आणि दोन बछड्यांनी हेच वासरू खाल्लं. त्यामुळे त्यांचा बळी गेल्याची बाब समोर आलीय, अशी माहिती चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक एस व्ही रामाराव यांनी दिलीय. 

नवे वर्ष देश आणि राज्यातील वाघांसाठी संकटाचे ठरले असल्याची माहिती पुढे आलीय.  मागील संपूर्ण वर्षात देशभरात १०८ वाघांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर असताना २०१९ या वर्षाच्या अवघ्या काही महिन्यात ६३ वाघांचा मृत्यू झालाय. 

भटक्या कुत्र्यांच्या नादात तीन वाघ गमावल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होतेय. त्यामुळे याबाबत जनजागृती करण्याची गरज व्यक्त करण्यात येतेय.