अंबरनाथमध्ये प्रेमविवाहाच्या वादातून तरुणाची हत्या, घटना मोबाईलमध्ये कैद

घडलेला हा प्रकार मोबाईल कॅमेरात कैद

Updated: May 13, 2021, 09:46 PM IST
अंबरनाथमध्ये प्रेमविवाहाच्या वादातून तरुणाची हत्या, घटना मोबाईलमध्ये कैद title=

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये प्रेमविवाह केल्याच्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. अंबरनाथ पूर्वेच्या बी केबिन रोड परिसरात घडलेला हा प्रकार मोबाईल कॅमेरात कैद झाला आहे.

विजय नवलगिरे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असून तो रिक्षाचालक होता. विजय याने ११ महिन्यांपूर्वी अंबरनाथ पश्चिमेतील एका मुलीशी प्रेमविवाह केला होता. अंबरनाथच्या बी केबिन रोड परिसरातील छाया अपार्टमेंटमध्ये तो पत्नीसह राहत होता. विजयची पत्नी ज्या परिसरात राहत होती, त्या भागातले काही तरुण विजयला आमच्या भागातल्या मुलीशी प्रेमविवाह का केला? असं म्हणत गेल्या काही दिवसांपासून त्रास देत होते. 

आज दुपारी ३.३० च्या सुमारास विजयच्या घरी ५ ते ७ तरुण आले आणि त्यांनी विजयला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याला घराबाहेर आणत त्याच्या डोक्यात फरशी घालण्यात आली, त्यानंतर त्याच्या डोक्यात मोठा दगड घालत त्याची हत्या करण्यात आली. 

मुख्य रस्त्यावर हा प्रकार सुरू असताना एका अज्ञात वाटसरूने हा प्रकार मोबाईल कॅमेरात चित्रित केला. या घटनेनंतर पोलिसांनी काही मिनिटात घटनास्थळी धाव घेत पळून जात असलेल्या दोन आरोपींना ताब्यात घेतलं, तर इतर आरोपींचा शोध सध्या सुरू आहे.