कायदा व्यवस्था धाब्यावर, पुण्यामध्ये कोंढव्यात तरुणाचा निर्घृण खून!

जुन्या भांडणाचा राग मनात धरून तरूणाची कोयत्याने वार करत हत्या   

Updated: Aug 4, 2022, 06:44 PM IST
कायदा व्यवस्था धाब्यावर, पुण्यामध्ये कोंढव्यात तरुणाचा निर्घृण खून! title=

पुणे - जुन्या भांडणाचा राग मनात धरून अनेक वर्षांनीसुद्धा काहीजण आपला बदला पूर्ण करतात. असाच काहीसा प्रकार पुण्यातील कोंढवा परिसरामध्ये घडला. पूर्ववैमनस्यातून एका तरूणाची कोयत्याने वार करत हत्या करण्यात आली आहे. महेश लक्ष्मण गुजर असं मृत तरूणाचं नाव असून तो शिवनेरीनगर विठ्ठलमंदिराशेजारी राहत होता.

नक्की काय आहे प्रकरण- 
महेश गुजर हा आपल्या गाडीवरून चालला होता. त्यावेळी कोंढव्यातील भगवा चौकामध्ये दोन तरूणांनी त्याला अडवलं. महेश थांबला तेव्हा त्यातील एका तरूणाने त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. कोयत्याच्या हल्ल्यामध्ये महेश गंभीर जखमी झाला आणि त्याचा जाग्यावर मृत्यु झाला. 

महेशच्या खुनाबाबत माहिती मिळाल्यावर कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील आणि पथक घटनास्थळी गेलं. त्यावेळी दोन्ही आरोपी पसार झाले होते आणि महेश रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. पूर्वीच्या भांडणातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी सांगितले. रात्री उशिरा कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

महेशला रूग्णालयात नेण्यात आलं होतं मात्र त्याचा आधीच मृत्यु झाल्यामुळे शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह ससून रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणामध्ये संशयित म्हणून राज पवार आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतलं आहे. 

दरम्यान, महेश गुजर याच्या बहिणीची एका तरुणासोबत मैत्री होती. यामुळे महेश आणि त्या तरूणामध्ये अनेकवेळा खटके उडालेले होते. अनेकवेळा याचं रूपांतर मोठ्या भांडणामध्ये झालं होतं. त्यातूनच हा खून झाला असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.