Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे महामार्गावरुन प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर आज पुन्हा दोन तासांचा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. दुपारी 12 ते 2 या वेळेत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गाने प्रवास करत असाल तर हे वेळापत्रक पाहणे आवश्यक आहे. अन्यथा तुमचा वेळ वाया जाऊ शकतो.
राज्यभरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. लोणावळा परिसरातही मुसळधार पाऊस पडतोय. या पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी सैल झाल्या आहेत. वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी सैल झालेल्या दरडी हटवल्या जाणार आहेत.
पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर दोन तासांचा ब्लॉक असल्याने पर्यायी मार्गाची माहिती देण्यात आली आहे. यानुसार हलकी वाहतूक मॅजिक पॉईंटपासून जुन्या पुणे मुंबई महामार्गाकडे वळविण्यात आली आहे.
या मार्गावर जड वाहतुकीला बंदी आहे. यामुळे जड वाहतूक जिथे आहे तिथेच थांबविली जाईल, याची नोंद घ्या. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला असला तरी मुंबईवरुन पुण्याकडे येणारी वाहतूक मात्र सुरूच राहणार आहे.
दरम्यान वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी जुन्या एक्स्प्रेसवेवर महामार्ग पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर 12 ते 2 वेळेत ब्लॉक घेतल्याने जुन्या मार्गावर कोंडी होण्याची शक्यता आहे. जुन्या मार्गावर वाहनांची आवक-जावक वाढणार असून दोन्ही मार्गावरील वाहतूक एकाच ठिकाणी आल्याने वाहतुक कोंडी होण्याची शक्यता आहे.