अंधेरीहून 8 मिनिटांत Mumbai Airport गाठता येणार, मेट्रोचा 'हा' मार्ग ठरणार सुपरफास्ट

Mumbai Metro Route 7A: मुंबई मेट्रो मार्ग 7 अ प्रकल्पाच्या मार्गातील 2.49 किलोमीटर लांबीच्या दुहेरी बोगद्यासाठी टी ६२ या टनेल बोरिंग मशीनच्या मदतीने 1 सप्टेंबर 2023 रोजी प्रारंभिक भुयारीकरणाचे काम सुरु झाले 

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 4, 2023, 02:52 PM IST
अंधेरीहून 8 मिनिटांत Mumbai Airport गाठता येणार, मेट्रोचा 'हा' मार्ग ठरणार सुपरफास्ट title=
Mumbai Metro 7A Update Tunnelling Work Begins Connecting CSMIA And Gundavali

Mumbai Metro Update: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून मुंबईत मेट्रोचे व उड्डाणपुलाचे जाळे विणत आहे. मेट्रोमुळं प्रवाशांचा प्रवास सुखाचा होणार आहे. मुंबई मेट्रो 7 अच्या मार्गाचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. मेट्रो 7 अ च्या मार्गातील बोगद्यासाठी पहिल्या टनेल बोरिंग मशीनच्या मदतीने भुयारीकरणाचे काम सुरू केले आहे. ही महत्त्वपूर्ण प्रगती आहे. मेट्रो मार्ग 7 मुळं विमानतळाचे अंतर कापणे सोपे होणार आहे. अंधेरीतून विमानतळाचे अंतर ८ मिनिटांत गाठणे शक्य होणार आहे. प्रकल्पातील भुयारीकरणाचे काम महत्त्वपूर्ण असून मे 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे लक्ष आहे. 

अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यान सुमारे 3.442 किमी लांबीच्या मुंबई मेट्रो मार्ग 7 अ प्रकल्पाचा विस्तार होत आहे.  या मार्गिकेतील अंशतः भाग पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि सहार उन्नत मार्गास समांतर धावते. ही मेट्रो मार्गिका मुंबई विमानतळासोबत मिरा-भाईंदर शहरास मेट्रो मार्ग 9 च्या सहाय्याने तर पश्चिम उपनगरांना मेट्रो मार्ग 2अ आणि 7 च्या सहाय्याने थेट जोडते.

अंधेरी स्टेशन व विले पार्ले स्थानकातून विमानतळावर जाण्यासाठी रस्तेमार्गे 20 ते 30 मिनिटांचा वेळ लागतो. पण मेट्रो-7 ए या मार्गावर सेवा सुरू होताच हे अंतर 8-10 मिनिटांवर येणार आहे. अंधेरी स्थानकातून 8 मिनिटांचा वेळ लागणार आहे. 

मेट्रो मार्ग 7 अने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मेट्रो मार्ग ३ आणि आंतराष्ट्रीय विमानतळादरम्यान भूमिगत स्थानकावर आंतरबदल(interchange) करण्याची सुविधा सहज उपलब्ध होणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरांसोबतच इतर शहरांची जोडणी अधिक वेगवान करण्यासाठी प्रस्तावित मेट्रो मार्ग 8 द्वारे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासोबत जोडण्यासाठी मुंबई मेट्रो मार्ग 7 अ एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. 

एमएमआरडीएकडून मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळाच्या दरम्यान 35 किमी लांब मेट्रो 8 कॉरिडोरच्या योजनेवरही काम करण्यात येत आहे. त्यामुळं नवी मुंबईकरांनाही विमानतळ गाठणे शक्य होणार आहे. 

मुंबई मेट्रो मार्ग ७ चा विस्तार असणारी मेट्रो 7अ  प्रकल्पातील ही प्रगती मुंबईच्या वाहतूक पायाभूत सुविधांच्या विस्ताराच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. सुमारे 3.442 किमी लांबीच्या मुंबई मेट्रो मार्ग 7 अ प्रकल्पाच्या मार्गातील 2.49 किलोमीटर लांबीच्या दुहेरी बोगद्यासाठी टी ६२ या टनेल बोरिंग मशीनच्या मदतीने 1 सप्टेंबर 2023 रोजी प्रारंभिक भुयारीकरणाचे काम सुरु झाले. जमिनीच्या पृष्ठभागापासून सुमारे 12 ते 28 मीटर इतका खोल बोगदा असणार आहे. ज्याच्यामुळे भूमिगत मेट्रो ते उन्नत मेट्रोपर्यंतचा प्रवास सुलभतेने होणार आहे