Mumbai Goa Highway : मुंबई -गोवा महामार्गाचे काम रखडल्याने कामाच्या डेडलाईनबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने मोठी टिप्पणी केली आहे. पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्यातील काम 31 मेपर्यंत पूर्ण होईल अशी माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे. त्यावर मुंबई-गोवा डेडलाईन पाळली जाते का बघू, अशी टिप्पणी उच्च न्यायालयाने केली आहे.
पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्यातील काम कंपनीला साहित्याचा तुटवडा भासल्याने लांबल्याची माहिती कंत्राटदाराने दिली. या महामार्गाचे रखडलेले काम आणि वाढते अपघात याबाबत वकील ओवेस पेचकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर उत्तर देताना च्च न्यायालयाने टिप्पणी केली आहे. त्यामुळे आता मुंबई-गोवा महामार्गाचा पहिला टप्पा 31 मेपर्यंत सुरु होण्यीची शक्यता आहे.
मुंबई - गोवा महामार्ग कामाची डेडलाईन जाहीर, नितीन गडकरी यांची मोठी घोषणा
मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूर ते झाराप या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम जानेवारी 2018 मध्ये मोठ्या अपेक्षेने सुरु झाले. परंतु कामात अपेक्षित गती मिळालेली नाही. धीम्या गतीने काम सुरु असल्याने महामार्गाला विलंब होत आहे. मार्च 2020 अखेर पूर्ण होण्याची अपेक्षा होती. मात्र अद्याप काम पूर्ण झालेले नाही.
दरम्यान, पनवेल ते इंदापूर या 85 कि.मी. लांबीच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम पूर्णात्वाला गेले आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यातील कशेडीच्या बोगद्याचे काम सुरु आहे. हे काम पूर्णत्वाकडे गेले आहे. तीन पदरी दोन बोगद्यामुळे 40 मिनिटांचे अंतर केवळ 9 मिनिटात पार करता येईल. तर संगमेश्वरमधील आरवली ते लांजा तालुक्यातील वाकेड हा 90 किमीचा टप्प्याचे काम जवळजवळ पूर्णपणे ठप्प आहे. चिपळूणजवळील परशुराम ते आरवली या 34 कि.मी. रस्त्यापैकी 20 किमी रस्ता अपूर्ण आहे.
सिंधुदुर्गमधील बहुतांशी काम समाधानकारक झाले आहे. राजापूरमधील पाचलपर्यंत महामार्गाचे काम पूर्णत्वाला गेला आहे. याउलट रायगडमधील परिस्थिती समाधानकारक नाही. कामाला अद्याप वेग आलेला नाही. दरम्यान, तब्बल 12 वर्षे रखडलेल्या मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचे नुकतेच चौथ्यांदा भूमिपूजन झाले. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पळस्पे ते कासू मार्गाच्या काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन खारपाडा टोलनाका इथे झाले. यावेळी मुंबई - गोवा महामार्गाचे काम 9 महिन्यांत पूर्ण करण्याची जबाबदारी घेत असल्याचे गडकरींनी म्हटले. तसेच कामे न केल्यास, कामांमध्ये अडचणी आणणाऱ्यांवर कारवाईचा इशारा त्यांनी दिला आहे.