Heat wave in Maharashtra : राज्यात एप्रिल महिन्यात पारा चाळीशीपार, पाच जिल्हे तापले

Heat wave in Maharashtra : राज्यात एप्रिल महिन्यात पारा चाळीशीपार गेला. ठाणे, पुणे, जळगाव आणि चंद्रपूर आणि वर्धा येथे 42 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. वाढत्या तापमानामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. रात्रीही घामाच्या धारा लागत होत्या.

सुरेंद्र गांगण | Updated: Apr 13, 2023, 07:51 AM IST
Heat wave in Maharashtra : राज्यात एप्रिल महिन्यात पारा चाळीशीपार, पाच जिल्हे तापले title=

Heat wave in Maharashtra :  एकीकडे अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत असताना ठाणे जिल्ह्यात उन्हाचे चटके बसू लागले आहेत. ठाणे शहरात बुधवारी तापमान 43.3 अंश नोंदवले गेले. वाढत्या तापमानामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. गेल्या तीन दिवसांपासून शहराचं तापमान चाळिशी पार गेले आहे. रात्री थंडी आणि दिवसा उष्मा असा वातावरणात बदल दिसत आहे. ठाणे शहरात 10  एप्रिलला 42.1 अंश सेल्सियस तर 11 एप्रिलला 42.8 अंश सेल्सियस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे. काल तापमानात आणखी वाढ झाली असून शहरात ४३.३ अंश सेल्सियस इतके कमाल तापमान नोंदवलं गेलं. सकाळी 10 ते दुपारी 3 या काळात प्रचंड उन्हाचा सामना करावा लागत आहेत. 

 ठाण्यासोबत पुणे, जळगाव, चंद्रपूर आणि वर्धा येथे 40 अंशाच्यावर तापमान नोंदवले गेले. वर्धा जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडताच तापमानही वाढू लागले आहे. एप्रिल महिन्यातच वर्ध्यातलं तापमान  39.9 अंशावर पोहोचलंय. उकरड्याने वर्धेकर हैराण झालेत. घराबाहेर पडताना योग्य काळजी घ्यावी, उष्माघातापासून बचावासाठी उपाय करावेत असं आवाहन आरोग्य खात्याने केले आहे. तर दुसरीकडे राज्यात अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. शेतकरी अडचणीत सापला आहे. शेतीचे मोठे नुकसान झाल्याने महागाई वाढ होण्याची शक्यता आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात अवकाळी पावसाचा इशारा

राज्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून अवकाळी पावसाचा जोर वाढतोय. हवामान विभागाच्या माहितीनुसार आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचा जोर आणखी वाढेल अशी शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी पुन्हा गारपिटीचा इशारा देण्यात आलाय. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील चार दिवस पावसाचा जोर वाढणार आहे. विदर्भातही काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे  केळी, आंबा, संत्रा, द्राक्ष या बागांचे मोठे नुकसान झालं आहे. तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी तसेच कांदा या पिकांना देखील मोठा फटका बसला आहे. भाजीपाला पिकांचेही मोठं नुकसान झालं आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त कांदा पिकाचे नुकसान झालं आहे. काढणी केलेला कांदा या पावसामुळं जागेवरच सडत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. 

तर दुसरीकडे काल रात्री मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुंबईत पाऊस झालाय. मध्यरात्री मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वा-यामुळे मुंबईत अनेक भागात झाडं पडली आहेत. तर काही ठिकाणी घरांवरचे पत्रे उडून गेले. मुंबईच्या सर्वच भागात वादळी वा-यासह जोरदार पाऊस झाला. पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस झाला. अंधेरी, मरोळ, जोगेश्वरी, मालाड, विलेपार्ले परिसरात जोरदार पाऊस झाला. मुंबई विमानतळ परिसरातही तुफान पाऊस झाला.