पुणे : मराठा आरक्षण स्थगितीच्या पार्श्वभूमीवर एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केली आहे. ८ ऑक्टोबरपर्यंत परीक्षा पुढे ढकल्याचा निर्णय घ्या. अन्यथा ९ ऑक्टोबरला राज्यातील जनता धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा मेटे यांनी दिला आहे.
मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम राज्य लोकसेवा आयोग आणि राज्य सरकार करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. मराठा आरक्षण स्थगितीच्या पार्श्वभूमीवर एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी विनायक मेटे यांनी केली आहे.
याशिवाय कोरोना परिस्थीतीत कोचिंग क्लासेस आणि अभ्यासिका बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करणे शक्य होत नाही. परीक्षेसाठीची साधने उपलब्ध नाहीत. कोरोनाचा संसर्ग झाल्यास कोण जबाबदार, या मुद्द्यांकडे मेटे यांनी लक्ष वेधलं आहे आहे.
मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या विरोधात षडयंत्र रचलं जात आहे आहे. त्यात मंत्रालयातील काही लोक सहभागी आहेत, असा गंभीर आरोप मेटे यांनी यावेळी केला. आमचा अंत पाहू नका, परीक्षा पुढे ढकला. अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लालेग. याचे परिणाम वाईट होतील, असा गंभीर इशारा त्यांनी यावेळी दिला आहे
आमच्यातील काही मंडळी ही परीक्षा होऊ द्या असे म्हणत आहेत. त्यांना विनंती आहे की मुलांचं भवितव्य अंधकारमय करू नका, राजकारण बाजूला ठेवा. सरकार बेफाम झाले आहे. मराठा आरक्षण मागणाऱ्याला बघून घेईन असे मंत्री म्हणत आहेत. अशा वाचाळवीरांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगाम घालावा, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, मराठा समाजात एकवाक्यता होत नाही हे दुर्दैव आहे. २०१६ पर्यंत मोजक्या संघटना होत्या. आता अनेक संघटना येताहेत आणि वेगवेगळी मते मांडत आहेत. त्यामध्ये काही लोंकांचा छुपा अजेंडा असू शकतो, असा घणाघात मेटे यांनी यावेळी केला.