10 कोटींचा निधी मिळून पण गोठ्याप्रमाणे विद्यार्थ्यांचे वर्ग; अमरावातीमध्ये 300 पेक्षा जास्त शाळांची दुरावस्था

Amravati ZP School : शाळेच्या दोन खोल्या असून दुरुस्तीसाठी प्रस्ताव गेला आहे की नाही याबाबत माहिती नाही. पावसामुळे तर मुलांना शाळेत पाठवण्याची आमची मनस्थिती देखील नाही अशी प्रतिक्रिया तिथल्या पालकांनी दिली आहे.

आकाश नेटके | Updated: Jun 29, 2023, 09:34 AM IST
10 कोटींचा निधी मिळून पण गोठ्याप्रमाणे विद्यार्थ्यांचे वर्ग; अमरावातीमध्ये 300 पेक्षा जास्त शाळांची दुरावस्था title=

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : राज्यात 30 जूनपासून जिल्हा परिषदेच्या (ZP School) शाळा सुरु होत आहेत. मात्र अमरावती (Amaravati News) जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाल्याचे पाहायला मिळत आहे. या शाळांमध्ये अमरावतीमधील गोरगरिबांची मुले शिक्षण घेत असतात. मात्र अनेक शाळांमधील वर्ग खोल्यांची अवस्था अतिशय बिकट झाल्याचे पाहायला मिळत आहे. या दुरावस्थेत असलेल्या शाळांमधील खोल्या पाडून नवीन बांधण्यात याव्यात अशी पालकांची मागणी आहे. धक्कादायक बाब म्हणजे निधी मिळाल्यानंतरही शाळांच्या वर्ग खोल्या दुरुस्त झालेल्या नाहीत. त्यामुळे आता याप्रकरणी काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

अमरावती जिल्ह्यातील 300 पेक्षा जास्त शाळांची दुरावस्था झाली असून अनेक शाळांची मोठी दयनीय अवस्था झाल्याचे पाहायला मिळत आहे. दुरावस्था झालेली वर्ग खोली एखाद्या विद्यार्थ्याच्या अंगावर कोसळून मोठा अनर्थ देखील होण्याची शक्यता आहे. अमरावती जिल्हा परिषदेला शाळा दुरुस्तीसाठी दहा कोटीचा निधी देखील प्राप्त झालेला आहे. मात्र तरीही या नादुरुस्त खोल्या पाडून नवीन बांधण्यात आलेल्या किंवा दुरुस्त देखील करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे पाकलांमध्ये मध्ये मोठ्या प्रमाणात संतापाची लाट निर्माण झाली आहे. 

दुसरीकडे या सर्व प्रकारामुळे विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेत पाठवावे की नाही असा प्रश्न पालकांमध्ये उपस्थित झाला आहे. दरम्यान शाळांच्या या गंभीर प्रश्नावर लक्ष न दिल्याने मानवाधिकार आयोगाने जिल्हाधिकारी आणि जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना समन्स बजावला आहे. त्यामुळे आता शाळांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात काय कारवाई होणार याकडे सर्वांच लक्ष्य लागलं आहे.