Covid-19 : महाराष्ट्रात नवीन ३५० कोरोनाग्रस्त, रुग्णांची संख्या २६८४

दिवसागणिक कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे.  

Updated: Apr 14, 2020, 09:55 PM IST
Covid-19 : महाराष्ट्रात नवीन ३५० कोरोनाग्रस्त, रुग्णांची संख्या २६८४ title=

मुंबई : दिवसागणिक कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. चीनमध्ये उदयास आलेल्या या धोकादायक वादळाने संपूर्ण जगातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत केले आहे. महाराष्ट्रात पुन्हा नव्याने ३५० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आज दिवसभरात १८ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे राज्यात रुग्णसंख्या २६८४ झाली आहे. अशी माहिती राज्य आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. 

 १८ जणांचा मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये १२ पुरुष आणि ६ महिलांचा समावेश आहे. १८ पैकी ११ रुग्ण हे ४० ते ६० या वयोगटातले आहेत. १८ पैकी १३ रुग्णांना मधुमेह, ब्लड प्रेशर, अस्थमा, हृदयरोग असे विकार होते. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे . ही अत्यंत चिंतेची बाब आहे.  

दिलासा देणारी बातमी म्हणजे आत्तापर्यंत २५९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे काही दिवसांपूर्वी रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३० एप्रिल पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी देशाला संबोधित करत लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवला.