आंबटशौकीन पोलिसांकडून तक्रारदार महिलेचा विनयभंग

विनयभंग किंवा महिलांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात महिलांनीच तक्रार करण्यासाठी पुढाकार घ्यावा, यासाठी सर्वच स्तरातून प्रोत्साहन केलं जातंय. मात्र, ठाणे पोलिसांचा संताप येईल अशी घटना कापूरबावडी पोलीस स्थानकात घडलीय.

Updated: May 30, 2017, 09:53 AM IST
आंबटशौकीन पोलिसांकडून तक्रारदार महिलेचा विनयभंग title=

कपील राऊत, झी मीडिया, ठाणे : विनयभंग किंवा महिलांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात महिलांनीच तक्रार करण्यासाठी पुढाकार घ्यावा, यासाठी सर्वच स्तरातून प्रोत्साहन केलं जातंय. मात्र, ठाणे पोलिसांचा संताप येईल अशी घटना कापूरबावडी पोलीस स्थानकात घडलीय.

महिला अत्याचारासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये स्वतंत्र कक्ष असतात. पण, एका महिलेला कापूरबावडी पोलीस स्टेशनमध्ये आलेला अनुभव अत्यंत संतापजनक आहे. दहा दिवसांपूर्वी रहात्या घरी आंघोळ करताना एका व्यक्तीनं चोरुन तीचं मोबाईलद्वारे चित्रीकरण केलं. चित्रीकरण केल्याचं लक्षात येताच तिनं त्या व्यक्तीला पकडलं आणि त्याचा मोबाईल घेतला... आणि सरळ कापूरबावडी पोलीस स्टेशन गाठलं... 

मात्र, पोलिसांनीच त्या महिलेकडे या चित्रीकरणाची मागणी केली. पोलिसांनी ते चित्रीकरण पुरावा म्हणून तिच्याकडं मागितलं. मात्र, हे चित्रीकरण केवळ एका पोलिसानं पाहिलं नाही. एकामागोमाग एक अनेक पोलीस येऊन ते चित्रीकरणसारखं पाहात होते. शुटिंग करणाऱ्या नराधमानं एकदा विनयभंग केला, पण पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा विनयभंग केल्याची या महिलेची आता भावना झालीय...

अखेर या विरोधात या पी़डित मुलीनं ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यकाडे दाद मागितली. महापौर शिंदे यांनी या प्रकरणाची दखल घेत थेट पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं आणि या गंभीर घटनेची तातडीनं दखल घेण्याची मागणी केली. 

ठाण्याचे पोलीस उपायुक्त सुनिल लोखंडे यांना प्रतिक्रीयेसाठी 'झी 24 तास'नं विचारलं असता असं पत्र आम्हाला आलेलंच नाही, असा दावा करत त्यांनी प्रतिक्रीया देण्याचं टाळलं. खरं तर महिलांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये विशेष कक्ष असतात. महिलांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी महिला पोलीस कर्मचारी असतात. मात्र, पोलिसांकडूनच असे प्रकार घडत असतील तर महिला तक्रार नोंदवण्यासाठी कशा? जातील हा खरा प्रश्न आहे..