ठाणे : ठाणे पोलिसांचा संताप येईल अशी घटना कापूरबावडी पोलीस स्थानकात घडलीय. विनयभंगाची तक्रार करण्यासाठी एक महिला पोलीस स्थानकात गेली होती. ही विवाहित महिला आंघोळ करत असताना एका व्यक्तीनं तिचं व्हिडिओ शुटिंग केलं. त्यासंबंधीची तक्रार करण्यासाठी ही महिला पोलीस स्टेशनमध्ये गेली होती.
पोलिसांनी ते चित्रीकरण पुरावा म्हणून तिच्याकडं मागितलं. मात्र हे चित्रीकरण केवळ एका पोलिसानं पाहिलं नाही. एकामागोमाग एक अनेक पोलीस येऊन ते चित्रीकरण सारखं पाहात होते. शूटिंग करणा-या नराधमानं एकदा विनयभंग केला, पण पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कर्मचा-यांनी अनेकवेळा विनयभंग केल्याची या महिलेची आता भावना झालीय.
याविरोधात दाद मागण्यासाठी त्या महिलेनं आता ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांच्याकडं मदत मागितलीय. महापौर शिंदे यांनी याप्रकरणी थेट पोलीस आयुक्तांना पत्र लिहून या गंभीर घटनेची तातडीनं दखल घेण्याची मागणी केलीय. तसंच महिलांच्या तक्रारीची दखल घेण्यासाठी वेगळ्या कक्षाची मागणी देखील केलीय.