पुणे : मशिदीवर जे भोंगे लागले आहेत. कुठून आले ते, कोणत्या नियमात लिहिलंय? हे भोंगे काढावेच लागतील. नाही काढले तर.. आताच सांगतोय.. मस्जिदीवरील भोंगे काढले नाही तर त्यासमोर दुप्पट स्पीकर लावून त्यावर हनुमान चालीसा वाजवू. मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यात हा इशारा दिला आणि त्यांचा 'हा' इशारा आदेश मानून त्याचे पालन करण्यास मनसैनिकांनी सुरुवात केलीय.
मुंबई घाटकोपर, कुर्ला या ठिकाणी मनसैनिकांनी लाऊडस्पिकरवर हनुमान चालिसा लावत आदेशाचं पालन केलं. यावर बराच वादही सुरु आहे.
दुसरीकडे राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. मनसेच्या शाखा अध्यक्षांसह इतर मुस्लीम पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिलीय.
राज ठाकरेंच्या आदेशाविरोधात भूमिका?
राज ठाकरे यांच्या आदेशवर पुण्यात मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांनी प्रसारमाध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली. राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आमची अडचण होऊ शकते, कात्रज भागातील भोंगे काढण्यासाठी आम्ही दबाव आणणार नाही आणि हनुमान चालीसाही लावणार नाही अशी भूमिका वसंत मोरे यांनी मांडली आहे.
आपण राज ठाकरे यांच्यावर नाराज नाही, त्यांनी मला बोलावलं तर आमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवू, माझं राजकारण राज साहेबांपासून सुरु होतं, मी कधीही राजीनामा देणार नाही, असंही वसंत मोरे यांनी स्पष्ट केलं आहे. ज्यांना राजीनामे दिले आहेत त्यांना भेटून त्यांची समजूत काढू असंही वसंत मोरे यांनी म्हटलंय.
राज ठाकरे यांचं भाषण आमच्या कार्यकर्त्यांना कळालेलं नाही, राज ठाकरे मशिदीवरील भोंगे काढले नाहीत तर, असा शब्द वापरला होता. त्यामुळे मशिदींवरील भोंगे काढण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे, राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी असं वसंत मोरे यांनी सांगितलं.
काही वॉर्डात 70 टक्के मुस्लीम लोकसंख्या आहे, आम्ही त्यांच्यात जाऊन करत आलो आहे. एक मुस्लीम गट आम्हाला येऊन भेटला, मशिदींवरील भोंग्याबाबत काही होणार, असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर असं काहीही होणार नाही असं आपण सांगितल्याचं वसंत मोरे यांनी सांगितलं. एक लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या वॉर्डात शांतता राहावी, आणि ही माझी जबाबदारी असल्याचं वसंत मोरे यांनी म्हटलंय.