अमर काणे, झी मीडिया, नागपूर : 'कोरोना इतना बढे की बस मुझे ले जाये, डेथ इज गोल ,मॅच्युरीरिटी इज द वे' अशा नोंदी नोटबूकमध्ये लिहित आठवीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये समोर आली आहे.
13 वर्षांच्या मुलीने राहत्या घरता गळफास घेत आपलं जीवनं संपवलं.
आर्या मानकर असं आत्महत्या करणाऱ्या मुलीचं नाव असून ती नागपुरातील एका नामांकित शाळेत आठव्या वर्गात शिकत होती. मध्यम वर्गीय कुटुंबातील आर्याचं संपूर्ण कुटुंब सुशिक्षित असून ती सुद्धा अभ्यासात खूप हुशार होती.
आर्याचे वडिल हरिश्चंद्र मानकर हे व्हिएनटी महाविद्यालयात नोकरी करतात. पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असं त्यांचं कुटुंब असून ते नागपूरमधल्या चंद्रमणीनगरात राहतात.
आर्याला डायरी लिहिण्याची सवय होती. मात्र फेब्रुवारी महिन्यापासून ती सातत्याने नोटबुक मध्ये मृत्यू आणि मृत्यूनंतरचा जग याविषयी विविध तज्ज्ञांचे विचार लिहून ठेवत होती. तिने मृत्यूवर कविताही लिहिली होती. त्यामुळे तिच्या मनात जगण्याविषयी नैराश्य निर्माण झाला असावं आणि त्या विचारातूनच तिने आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
मृत्यू किती सुंदर आहे, यावर तिने आपल्या डायरीत विचार मांडले होते. जर कोरोना पुन्हा आला तर मला मरायला आवडेल, असा उल्लेख तिने आपल्या डायरीत केला होता. सोमवारी सकाळपर्यंत आर्या एकदम सामान्य होती. तिचे वडील नोकरी वर गेले, मोठा भाऊ दुसऱ्या खोलीत अभ्यास करत होता तर आई स्वयंपाक घरात काम करत होती. त्याचवेळी आर्याने आपल्या अभ्यासाच्या खोलीत जाऊन गळफास घेत आत्महत्या केली.
काहीवेळाने आर्याला जेवायला बोलावण्यासाठी आई त्या खोलीत गेली आणि समोरचं दृष्य बघून तीने हंबरडा फोडला. आर्याच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अजनी पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.