...आणि या मनसैनिकांसोबत अमित ठाकरेंनी स्वतःहून काढला फोटो

 विद्यार्थी सेनेच्या ठाण्यातील मनसैनिकांची कौतुकास्पद कामगिरी

Updated: Feb 10, 2020, 04:11 PM IST

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : पाकिस्तान आणि बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात मनसेचा काल महामोर्चा पार पडला या महामोर्चानंतर आझाद मैदानातील हजारो प्लास्टिकच्या बाटल्या एकत्रित करून इथली साफसफाई मनसे विद्यार्थी सेनेच्या ठाण्यातील मनसैनिकांनी केली.

त्यांच्या या उपक्रमाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी आज कौतुक केले.

त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. शिवाय आवर्जून मला तुमच्या सोबत फोटो काढायचा आहे असं सांगत फोटो ही काढला.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे त्यांच्या महाराष्ट्र सैनिकांनी सामाजिक भान जपत काल मोर्चा नंतर आझाद मैदानची साफसफाई केली होती.

राज ठाकरे आक्रमक 

राज ठाकरे यांनी सीएए/एनआरसीला जाहीर पाठिंबा दिला आहे. मोदी सरकारकडे त्यांनी सीएए कायद्याच्या कठोर अंमलबजावणीची मागणी केली आहे. सीएए आणि एनआरसीवर केंद्र सरकारने त्वरित कारवाई करायला हवी असे राज ठाकरे म्हणाले.

हा देश साफ व्हायलाच पाहिजे.  एकदा देशाने कडक होण्याची गरज देखील राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली. मोर्चाला मोर्चाने उत्तर दिलंय. यापुढे दगडाला दगडाने उत्तर आणि तलवारीला तलवारीने उत्तर दिले जाईल असे म्हणत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ते आक्रमक दिसले.