नवी दिल्ली : भारतानं एका एन्टी सॅटेलाईट हत्याराद्वारे (Anti-satellite weapon) पृथ्वीच्या खालच्या कक्षेत (एलईओ) केवळ तीन मिनिटांत एक लाईव्ह सॅटेलाईटला पाडून एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या मोहिमेद्वारे, चाचणी म्हणून भारतानं आपलाच एक निकामी झालेला परंतु, पृथ्वीकक्षेत ३०० किलोमीटर उंचीवर फिरणारा उपग्रह केवळ तीन मिनिटांत पाडला. पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी या उपग्रहाला केवळ ९० मिनिट लागतात. जगभरातून यासाठी भारताचे कौतूक होत आहे. राजकीय नेत्यांनीही अंतराळविरांचे यासाठी अभिनंदन केले आहे. दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी अंतरिक्ष आयोगाचा सहा वर्ष सदस्य होतो. त्याचबरोबर पंतप्रधान कार्यालयाचा राज्यमंत्री म्हणून सहा वर्ष अंतरिक्ष विभागाचे काम जवळून पाहिले आहे. आजची उपलब्धी मोठी आहे, त्याबद्दल अंतरिक्ष वैज्ञानिकांचे अभिनंदन केले पाहिजे असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
1962 साली पंडित जवाहरलाल नेहरू यांनी इंडियन सायन्स स्पेस रिसर्च कमिटीची स्थापन करून भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञानाचा पाया घातला. 1969 साली त्याचं रुपांतर इस्त्रोमध्ये करण्यात आले. 1972 साली अंतरिक्ष आयोगाची स्थापना झाली. तेव्हापासून आपण अंतरिक्ष विज्ञानाचा वापर टेलिकम्युनिकेशन, ब्रॉडकास्टिंग, नकाशे तयार करणे, पिकांची पाहणी करणे वापर करत आल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.
मिसाईल तंत्रज्ञानाचा जन्म इस्त्रोतून झाला. उपग्रह विरोधी क्षेपणास्त्राची चाचणी आज झाली आहे. आमच्या सरकारच्या काळात संरक्षण खात्याचे राष्ट्रीय सल्लागार व्ही के सारस्वत होते, त्यांनी 2012 साली भारताने अशा पद्धतीचे तंत्रज्ञान विकसित केल्याची घोषणा केली होती याची आठवणही पृथ्वीराज यांनी यावेळ करुन दिली. त्यामुळे आपल्याकडे हे तंत्रज्ञान आधीच होते, फक्त त्याची चाचणी केली नव्हती असेही ते म्हणाले. त्याची चाचणी घ्यायची की नाही हा निर्णय राजकीय होता. तेव्हा चाचणी घेतली नाही किंवा केली असेल तर ते जाहीर केली नाही दोन्ही गोष्टी आहेत, त्याबद्दल सांगता येणार नाही असेही ते म्हणाले.