चोराने दिली स्वत:च्या क्राईम पार्टनर पत्नीच्या हत्येची कबुली

 एका वर्षाने आरोपी पोलिसांच्या कचाट्यात

Updated: Oct 19, 2020, 07:59 PM IST
चोराने दिली स्वत:च्या क्राईम पार्टनर पत्नीच्या हत्येची कबुली title=

प्रथमेश तावडे, झी मीडिया, मीरारोड : मीरारोडच्या काशीमीरा पोलिसांनी क्रेडिट कार्ड मशीनच्या मदतीने ग्राहकांच्या खात्यातील लाखो रुपये लंपास करणाऱ्या आरोपीला अटक केलय. आशिष उकाणी असें या भामट्याचे नाव असून  पैशाच्या वादातून पत्नीची  हत्या केल्याचा खळबळजनक खुलासा आरोपीने केला आहे. निकिता दोषी असे आरोपीच्या पत्नीचे नाव आहे.  तिची हत्या करून झाल्यानंतर तब्बल एका वर्षाने हा आरोपी पोलिसांच्या कचाट्यात सापडलाय. 

२०१९ मध्ये आशिष उकानी आणि निकिता दोषी हे पतीपत्नी क्रेडिट कार्ड कंपनी आणि बँक या दोघांमधील दुआ म्हणून मैत्रीण कंपनीच्या नावाने व्यवहार चालवत होते. मात्र या दोघांनी आपसात संगतमत करून क्रेडीट कार्ड मशीनद्वारे इनव्हॉइस बेस पद्धतीचा वापर करून एका ग्राहकाच्या खात्यातील तब्बल पंधरा लाख रुपये लंपास केले होते. त्यानंतर गुजरात,सुरत येथे पलायन करून लपून बसले होते.

याप्रकरणी फसवणूक झालेल्या कंपनीद्वारे काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांकडून या आरोपींचा शोध सुरू झाला. मात्र तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा शोध घेणे शक्य होत नव्हते. अखेर बऱ्याच महिन्यांच्या प्रयत्नानंतर आरोपी हे सुरत येथे वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्याला सुरत येथून अटक करण्यात आली. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मीरा रोड येथून केलेल्या फसवणुकीच्या प्रकारानंतर आरोपींनी सुरत येथे पलायन करून त्याठिकाणी एक महिना वास्तव्य केले होते. १३ ऑक्टोबर २०१९ रोजी आशिषचे मूळगाव असलेल्या सेलना येथील एका हॉटेलमध्ये दोघे आरोपी राहण्यासाठी थांबले होते. त्यांनतर  १५ ऑक्टोबर २०१९ रोजी मध्यरात्री  आशिष आणि निकिता हॉटेलबाहेर निघाले होते. त्यानंतर दारू पिण्यासाठी एका शेतात बसले होते.

रात्रभर दोघांनी केलेल्या पार्टीनंतर सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास गाडी आणि पैशांवरून दोघांमध्ये चांगलेच जुंपले होते. दोघांमध्ये  झालेला हा वाद विकोपाला गेला आणि त्या रागात आशिषने निकीताला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने शेजारी असलेल्या विहिरीत  ढकलून दिले. कोणाला याची खबर लागू नये यासाठी  मृतदेह रश्शीच्या सहाय्याने विहिरीबाहेर काढून शेतात खड्डा करून पुरला आणि त्यानंतर त्यावर मीठ टाकल्याची कबुली आरोपीने दिली.

तब्बल एक वर्षानंतर मिळालेल्या धागेदोऱ्यांच्या आधारावर मीरारोड पोलिसांनी आरोपीने गुजरात इथल्या सांगितलेल्या ठिकाणी जाऊन मॅजिस्ट्रेट, फॉरेन्सिक एक्स्पर्ट आणि पंचांच्या मदतीने शोध घेतला असता जमिनीत सांगाड्याचा मृतदेह आढळून आला. एखादा गुन्हा करून तो लपवायचा कितीही प्रयत्न केला तरी तो आज ना उद्या पोलिसांसमोर उघडकीस येतो हे या घटनेतून स्पष्ट झालंय.