प्रथमेश तावडे, मिरारोड : मीरा-भाईंदरमध्ये कोरोनाचा गंदा धंदा होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून पालिकेने कोविड उपचार देणाऱ्या ऑरचिड हॉस्पिटल आणि कोरोनाचे बनावट रिपोर्ट देणाऱ्या स्वस्तिक आणि अपूर्वा लॅबवर कारवाई केली आहे.
या लॅबमधून कोरोना चाचणीसाठी आलेल्या नागरिकांना ते निगेटिव्ह असतानाही पॉझिटीव्ह असल्याचा अहवाल देऊन संगतमताने ओरचिड हॉस्पिटलमध्ये उपचार दिले जात होते.
शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येचा आलेख कमी येत असतानाही या हॉस्पिटलमध्ये अनेक रुग्ण पॉझिटिव्ह येत असल्याच्या संशयाने पालिकेच्या आरोग्य विभागाने येथील रुग्णांची आरटीपीसीआर केली.
यावेळी टेस्ट केलेले रुग्ण निगेटिव्ह आले व सुरू असलेल्या प्रकाराचा भांडाफोड झाला. मीरा भाईंदर महापालिकेने कारवाई म्हणून सदर हॉस्पिटलला देण्यात आलेली कोविडची मान्यता रद्द करून त्यांचे रजिस्ट्रेशन रद्द केले आहे. पालिकेने दिलेल्या तक्रारीवरुन याप्रकरणी नयानगर पोलीस ठाण्यात हॉस्पिटल व दोन्ही लॅब विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशाप्रकारे जर रुग्णालय आणि कोरोनाची चाचणी करणारे लॅब नागरिकांची कोरोनाच्या नावावर लूट करत असतील तर त्यांवरही कारवाई करण्यात येईल असा इशारा महापालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांनी दिला आहे.