मोठी बातमी! वसतिगृहातील अल्पवयीन मुलींना पर्यटकांसमोर नाचवले, नाशिकमध्ये खळबळ

Nashik News Today: नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. वसतिगृहातील अल्पवयीन मुलींना पर्यटकांसमोर नाचण्यास भाग पाडल्याचे समोर आले आहे. 

Updated: Jun 20, 2023, 02:19 PM IST
 मोठी बातमी! वसतिगृहातील अल्पवयीन मुलींना पर्यटकांसमोर नाचवले, नाशिकमध्ये खळबळ title=
Minor girls from the hostel were forced to dance in front of tourists in nashik

नाशिकः  नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.  त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिने गावातील खासगी संस्थेच्या वसतिगृहातील अल्पवयीन मुलींना खाजगी रिसॉर्टमध्ये पर्यटकांसमोर जबरदस्ती नाचण्यास सांगितल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. पर्यटकांसमोर जबरदस्तीने नाचण्यास सांगितले जात असल्याची तक्रार पालकांनीच केल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ही शाळा आणि रिसॉर्ट एकच मालकाचे असल्याची चर्चा या भागात आहे. या प्रकारामुळे पालकांनी मुलींना घरी आणले असून या प्रकरणी संस्थेचे चालक आणि शिक्षिकांविरुद्ध वाडीवऱ्हे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहिने येथे एका खासगी संस्थेची काही वर्षांपासून कायमस्वरूपी विनाअनुदानित इंग्रजी माध्यमाची प्राथमिक शाळा आहे. या शाळेला जोडून यंदा मुलींसाठी वसतिगृह सुरू करण्यात आले आहे. शाळा सुरू होण्यास पंधरा दिवसांचा अवधी असताना वसतिगृहात सातवी ते नववीच्या विद्यार्थिनींना ३१ मे २०२३ पासूनच प्रवेश देण्यात आला. सुट्टीत मुलींना पारंपरिक नृत्य व संगणक शिक्षण दिले जाणार असल्याचे संस्थेने सांगितले होते. प्रत्यक्षात संगणक शिक्षण दिले नसल्याचा आरोप मुलींनी केला आहे. 

संस्थेची सहावीपर्यंतच शाळा असल्याने या मुलींना त्र्यंबकेश्वर येथील शाळेत शिक्षणासाठी पाठविले जाते. पालकांनी मुलींसाठी प्रत्येकी ३,५०० रुपये अनामत रक्कम जमा केली. या संस्थेच्या शाळेमागील टेकडीवर हॉटेल असून तेथे मे महिन्याच्या अखेरीस काजवे पाहण्यासाठी पर्यटक येतात. त्यांच्यासमोर सायंकाळी सहा ते रात्री नऊ दरम्यान अल्पवयीन मुलींना नाचण्यास भाग पाडल्याची तक्रार करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलींना नाचण्यास नकार दिल्यास शिक्षिका संस्थाचालकांच्या सांगण्यावरून दमदाटी करतात व छड्या मारतात, अशी तक्रार मुलींनी पालकांकडे केली. पालकांनी वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या मुलींना आता दुसऱ्या शाळेत दाखल केले आहे.