Mhada Home News : स्वत:चे घर असावे असे प्रत्येकाचं स्वप्न असते. त्यामुळे सरकारी योजनेतील घरांना लोकांची पसंती मिळत असते. आता तर म्हाडाचं घर घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुणे मंडळाने म्हाडा गृहप्रकल्प ( Pune MHADA) आणि पंतप्रधान आवास योजनेतल्या घरांची अनामत रक्कम तब्बल पाच पटींनी वाढवली आहे. विशेष म्हणजे अल्प आणि अत्यल्प गटांसाठीही वाढ लागू करण्यात आली आहे.
पुणे, मुंबई, कोकण, औरंगाबाद, नाशिक अशा मंडळाच्या सोडतीला मोठा प्रतिसाद मिळतो. मात्र त्याचवेळी अनामत रक्कम कमी असल्याने एकच व्यक्ती अनेक अर्ज भरते. त्यातही दलालांकडून मोठया संख्येने अर्ज भरले जातात. अशावेळी सोडतीत स्पर्धा वाढते आणि गरजू अर्जदार अडचणीत येतात. त्याला आळा घालण्यासाठी अनामत रक्कमेत वाढ करण्यात आल्याचे स्पष्टीकरण पुणे मंडळातील अधिकाऱ्यांनी दिले आहे.
मात्र या निर्णयाचा सर्वसामान्यांना फटका बसणार आहे. पुण्यापाठोपाठ कोकण मंडळानंही अनामत रकमेचा प्रस्ताव तयार असल्याचे समजत आहे तर मुंबई मंडळाच्या सोडतीतील अत्यल्प आणि अल्प गटाच्या रकमेत कुठलीही वाढ केली जाणार नाही, असे सांगितले जात आहे. दरम्यान, मुंबई मंडळाच्या सोडतीतील अत्यल्प आणि गटाच्या रक्कमेत कोणतीही वाढ केली नसली तरी मध्यम आणि उच्च गटात वाढ होईल. याबाबची माहिती मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली.
अत्यल्प गटात 5 हजार रुपयांवरुन थेट 25 हजार रुपयांची अनामत रक्कम भरावी लागेल. 20 टक्के योजनेतील घरांसाठीच्या रक्कमेत दुप्पट वाढ केली आहे. यातील अत्यल्प गटाच्या घरांसाठी 5 हजारांऐवजी 10 हजार रुपये भरावे लागतील. पुणे मंडळाच्या 5966 घरांच्या सोडतीतील म्हाडा गृहप्रकल्पातील 2925 घरांच्या तसेच पंतप्रधान आवास योजनेतील 396 घरांच्या अनामत रक्कमेत वाढ करण्यात आली आहे.
अत्यल्प गटासाठी 5 हजारांवरुन थेट 25 हजार रुपये, अल्प गटातील लोकांसाठी 10 हजार रुपयांवरुन 50 हजार रुपये तर मध्यम गटातील लोकांसाठी 15 हजारांवरुन 75 हजार रुपये करण्यात आली आहे. तर उच्च उत्पन्न गटातील लोकांसाठी 20 हजार रुपयांवरुन 1 लाख रुपये करण्यात आली आहे.