खुशखबर! म्हाडाची १४,२६१ घरांसाठी लॉटरी; गिरणी कामगारांसाठी ५०९० घरे

अर्ज स्वीकारण्याच्या प्रक्रियेला लवकरच सुरुवात होईल.

Updated: Jul 9, 2019, 06:41 PM IST
खुशखबर! म्हाडाची १४,२६१ घरांसाठी लॉटरी; गिरणी कामगारांसाठी ५०९० घरे title=

मुंबई: सामान्य लोकांना शहरांमध्ये परवडेल अशा दरात घरे उपलब्ध करून देणाऱ्या महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र निर्माण प्राधिकरण अर्थात म्हाडाकडून लवकरच नव्या घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. राज्यभरातील १४,२६१ घरांसाठी ही सोडत काढली जाईल. यामध्ये पुण्यातील दोन हजार, नाशिकमधील ९२, औरंगाबादमधील १४८, नागपूरमधील ८९८, अमरावतीमधील १२०० आणि कोकणातील पंतप्रधान आवास योजनेतंर्गत बांधण्यात आलेल्या ५३०० घरांचा समावेश आहे. याशिवाय, मुंबईत गिरणी कामगारांसाठीच्या ५०९० घरांसाठीही लॉटरी काढली जाणार आहे. 

जून महिन्यातच 'म्हाडा'कडून मुंबईतील २१७ घरांसाठी लॉटरी काढण्यात आली होती. यामध्ये  चेंबुरच्या सहकार नगरमधील १७०, तर मध्यम उत्पन्न गटासाठी ४७ सदनिकांचा समावेश होता. या घरांसाठी तब्बल ६६ हजार जणांनी अर्ज केले होते. 

दरम्यान, आगामी लॉटरीसाठी म्हाडाकडून लवकरच अर्ज स्वीकारण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होईल. म्हाडाने यापूर्वीच एकाच अनामत रक्कमेवर अनेक घरांसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे सामान्यांना मोठा दिलासा मिळाला होता. अनामत रक्कम ही नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, आरटीजीएस आणि एनईएफटी याद्वारे भरता येणार आहे. ऑनलाइन अर्ज ‘लॉटरी डॉट म्हाडा डॉट जीओव्ही डॉट इन’या संकेतस्थळावरून स्वीकारले जातील.