अनिरुद्ध ढवाळे, झी मीडिया, अमरावती : मेळघाटात (Melghat News) दरवर्षी कुपोषण (Malnutrition), माता मृत्यू आणि बालमृत्यू मोठ्या प्रमाणात होत असल्याचे पाहायला मिळतं. त्यामुळे मेळघाट हा कायमच चर्चेत असतो. मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा या आदिवासीबहुल तालुक्यांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे. या आजारांवर उपचार घेण्यासाठी लोक दवाखान्यात जात नाहीत. घरगुती उपचाराकडे अनेकजण भर देतात. यामुळे अनेकदा मृत्यू देखील होता. अशातच धारणी उपजिल्हा रुग्णालयातून एक आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे. धारणी उपजिल्हा रुग्णालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका गरोदर मातेने तब्बल चार मुलींना जन्म दिला आहे. त्यामुळे संपूर्ण मेळघाटात याची चर्चा पाहायला मिळत आहे.
धारणी तालुक्यातील दूनी गावातील पपीता बलवंत उईके या तिसऱ्या प्रसुतीकरता बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. दरम्यान धारणी उपजिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञांनी पपीताची सामान्य प्रसृती यशस्वीरित्या पार पाडली. मात्र या प्रसुती दरम्यान गरोदर पपीताने एका नंतर एक अशा तब्बल चार मुलींना जन्म दिल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
धारणी उपजिल्हा रुग्णालयातील ही पहिलीच घटना असून जन्म झालेल्या चारही मुली सुखरुप आहेत. मुलींचे सरासरी वजन 1 किलो 200 ग्रॅम आहे. पपीता आणि जन्म झालेल्या चारही मुलींवर धारणी उपजिल्हा रुग्णालयात पुढील उपचार सुरू आहेत. जन्म झालेल्या चारही मुलींचे वजन कमी असल्यामुळे त्यांना रुग्णालयातील एस एन सी यू मध्ये ठेवण्यात आले आहे. प्रसृतीनंतर माता व मुली दोघांचीही परिस्थिती सामान्य असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
"12 जुलै रोजी उपजिल्हा रुग्णालय धारणी येथे पतीता उईके नावाची महिला दाखल झाली होती. या महिलेने चार बालकांना जन्म दिला आहे. चारही बालके सुरक्षित आहेत. महिलेची सामान्य प्रसृती झाली आहे. बालकांचे वजन कमी असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे," अशी माहिती धारणी येथील स्त्री रोग तज्ञ प्रीती शेंद्रे यांनी दिली.
मध्य प्रदेशात महिलेनं दिला सहा मुलांना जन्म
काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यातील एका रुग्णालयात एका महिलेने सहा मुलांना जन्म दिला होता. मात्र त्यांना वाचवता आले नाही आणि सर्व मुले एकामागून एक मरण पावली. जन्मानंतर 10 मिनिटांतच पाच मुलांचा मृत्यू झाला. त्यानंतर रात्रीच्या सुमारास सहाव्या बाळाचाही मृत्यू झाला. सर्व मुलांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते, मात्र एक एक करून सर्वांचा मृत्यू झाला. रुग्णालय व्यवस्थापनानुसार मुलांना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.