Mazi Ladki Bahin Yojana : रक्षाबंधनाआधीच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मानधन एकत्रितरित्या बँक खात्यावर जमा केले जाणार आहेत. मात्र, आजपासूनच लाडकी बहीण योजनेचे 3 हजार रुपये महिल्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. 2 महिन्यांचे 3000 रुपये खात्यात जमा होण्यास सुरूवात झाली आहे. भाजप नेते राम सातपुते यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.
3-4 दिवसांवर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधनचे पवित्र औचित्य साधून स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रातील बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळायला सुरुवात झाली आहे. 31 जुलैपूर्वी अर्ज सादर केलेल्या बहिणींच्या बँक खात्यावर जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांच्या लाभाची रक्कम, प्रत्येकी 3000 रुपये वर्ग करण्यात आले आहेत. 31 जुलै नंतर अर्ज सादर केलेल्या बहिणींच्या खात्यावरही लवकरच लाभाची रक्कम जमा करण्यात येणार आहे असे ट्विट राम सातपुते यांनी केले आहे. तसेच राम सातपुते यांनी ट्विटच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. दरम्यान, सध्या ट्रायल म्हणून महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले आहेत. प्रत्यक्षात 17 ऑगस्टनंतरच लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेची रक्कम रक्षाबंधनाच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यांवर जमा होण्यास सुरुवात!!
राज्यभरात अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेल्या या योजनेत राज्यभरातून कोट्यावधी माता-भगिनींचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातून मान्यता प्राप्त अर्जदारांना थेट… pic.twitter.com/iTeaZpCH71
— Ranajagjitsinha Padmasinha Patil (@ranajagjitsinh1) August 14, 2024
रक्षाबंधनाआधीच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मानधन एकत्रितरित्या बँक खात्यावर जमा होणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. महिलांनी लवकरात लवकर या योजनेसाठी अर्ज दाखल करावेत असं आवाहनही अजित पवारांनी केले आहे. तसंच लाडकी बहीण योजनेअंतर्गत पहिला निधी रक्षाबंधनाच्या दरम्यान दिली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.
जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनात केली होती. दरवर्षी योजनेसाठी 46 हजार कोटीचा निधी उपलब्ध केला जाणार आहे. 21 ते 60 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत. ज्यांच्या कुटुंबाचं एकत्रित उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत सुमारे 1 कोटी 45 लाख 76 हजार महिलांनी नोंदणी केलेली आहे. आणि त्यातील एकूण 1 कोटी 34 लाख 30 हजार 784 अर्ज पात्र ठरले आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. तसेच 31 ऑगस्ट, 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना 01 जुलै, 2024 पासून दर माह रु.1500/- आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.