Marathwada Muktisangram: तुम्ही रझाकारांना धडा शिकवलात, आता तुमच्यावर ही वेळ ज्यांनी आणि आणली त्या 'सजा'कारांना शिक्षा द्या, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त त्यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या. दिवसेंदिवस संपूर्ण मराठवाड्यात उत्सवासारखा साजरा व्हायला हवा; कारण मराठवाडा मुक्ती संग्राम हा काही विलीनीकरणाचा लढा नव्हता तर तो देशाच्या अखंडतेसाठी दिलेला लढा होता, असे ते म्हणाले.
फक्त 'फोटो-ऑप' म्हणून कार्यक्रम साजरे करणं किंवा मराठवाड्यात येऊन आश्वासनांची खैरात वाटणं म्हणजे हा दिवस साजरा केला असं मानून चालणार नाही. पुरेशा पाण्यासाठी मराठवाड्याचा झगडा गेली कित्येक दशकं सुरु आहे, आणि ह्यावेळेला मराठवाडा क्षेत्रांत पुरेसा पाऊस झाला नसल्यामुळे पुढच्या काही महिन्यांत पाण्यासाठीची वणवण बघायला मिळणार आहे. अशावेळेस एकांनी आश्वासनं द्यायची आणि त्यावर दुसऱ्यांनी टीका करायची आणि टीका करणाऱ्यांनी आपण सत्तेत असताना नक्की काय केलं ह्याचा विचार करायचा नाही हे सुरु राहणार असेल तर मराठवाड्यातील जनतेने आता दोघांनाही प्रश्न विचारायची वेळ आल्याचे राज ठाकरे म्हणाले.
तुम्ही जो लढा दिलात तो काही तुमच्या तोंडाला कोणीतरी पानं पुसावीत म्हणून नव्हता ह्याचं स्मरण राहू दे आणि तुम्हाला गृहीत धरणाऱ्यांना धडा शिकवण्याची हीच ती वेळ आहे, आणि त्यासाठी निर्धार करण्याचा आजचा हा दिवस आहे.
आज १७ सप्टेंबर, मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा दिवस. मी मागे पण एकदा म्हणालो होतो तसं हा दिवस संपूर्ण मराठवाड्यात उत्सवासारखा साजरा व्हायला हवा; कारण मराठवाडा मुक्ती संग्राम हा काही विलीनीकरणाचा लढा नव्हता तर तो देशाच्या अखंडतेसाठी दिलेला लढा होता.
पण हे करताना फक्त 'फोटो-ऑप' म्हणून…
— Raj Thackeray (@RajThackeray) September 17, 2023
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ध्वजारोहण करत हुतात्म्यांना अभिवादन केलं. स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर 1948 मध्ये भारत सरकारने निजाम शासनाविरुद्ध पोलीस कारवाई करून हैदराबाद संस्थान भारतात सामावून घेतले. 17 सप्टेंबर 1948 ला हैदराबाद राज्य निजामापासून मुक्त केले गेले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एका वर्षानंतर मराठवाडा मुक्त झाला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी मराठवाड्याचा विकास करण्याचा संकल्प करत शपथ घेतली.