अलिबाग : फेरी वाले हटाव आंदोलना नंतर पुन्हा एकदा मराठीच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. रायगड जिल्ह्यातील खोपोली शहरातील मनसेने दुकानांवरील मराठी पाट्यांच्या मागणीसाठी मनसे स्टाईलने आंदोलन केले.
या आंदोलनामुळे खोपोली पोलीस स्टेशन आवारात व्यापारी विरुद्ध मनसे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाल्यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. राज ठाकरे यांनी अलीकडेच पुन्हा एकदा दुकानांवरील मराठी पाट्ट्यांबाबत आक्रमक भूमिका जाहीर केल्याने रायगड जिल्हा मनसेने राज ठाकरे यांचे पत्र व्यापारी वर्गाला दिले आहे.
पत्र देऊन काहीच होत नसल्याने खोपोली मनसेने बाजार पेठेत जोरदार घोषणाबाजी करून दुकानांच्यावर असणाऱ्या इंग्रजी पाट्ट्यांवर काळी शाई फेकून मनसे स्टाईलने आक्रमक पद्धतीने आंदोलन केले. दरम्यान खोपोली पोलिसांनी मनसेच्या सहा कार्यकर्त्यांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये खोपोली मनसे शहर प्रमुख अनिल मिंडे यांचा समावेश आहे.