Marathi Abhijat Bhasha : 'माझा मराठीची बोलू कौतुके, परि अमृतातेहि पैजासी जिंके....' असं मराठी भाषेचं वर्णन ज्ञानेश्वर माऊलींनी केलं आहे. मराठी भाषेला जवळपास 2000 वर्षांपूर्वीचा इतिहास असल्याचं सांगितलं जातंय. मात्र याच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नव्हता... अखेर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीआधी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा केली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देणारा 2000 वर्षांपूर्वींचा अत्यंत महत्वाचा पुरावा पुण्यातील नाणेघाटात सापडला आहे.
एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठीची पहिली अट म्हणजे ती भाषा अगदी पुरातन म्हणजे दोन हजार वर्षांपूर्वीची असल्याचा पुरावा असणं गरजेचं असतं आणि हाच पुरावा मराठी भाषे करिता मिळाला आहे तो पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या पश्चिम भागात असणाऱ्या नाणेघाटातील एका लेण्यांमध्ये.... या लेण्यांच्या दगडी भिंतींवर सातवाहन काळातील एक शिलालेख कोरलेला असून हाच पुरावा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी महत्वाचा ठरला आहे...
अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी काही निकष आहेत. भाषा स्वतंत्र असणे, त्यात मौलिक साहित्यनिर्मिती होणे, भाषेचे वय किमान दोन हजार वर्षे असणे, भाषेचे सलग प्रवाही अस्तित्व असणे. हे सारे निकष मराठी भाषा पार करते. मराठीसह पाली, आसामी, प्राकृत आणि बंगाली भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्राने घेतलेला आहे.
मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याच्या निर्णयानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत.. आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व सन्माननीय मंत्र्यांचे महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या वतीने अतिशय मनापासून आभार मानतो. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मायमराठीचा हा बहुमान मनाला अतिशय सुखद अनुभूती देणारा आहे. अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिलीय...
1) मराठीच्या बोलींचा अभ्यास, संशोधन, साहित्यसंग्रह करणं
2) भारतातील सर्व 450 विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय करणं
3) प्राचीन ग्रंथ अनुवादित करणं
4) महाराष्ट्रातील सर्व 12,000 ग्रंथालयांना सशक्त करणं
5) अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने नोकरीच्या संधीत वाढ
6) भाषांतर, नोंद, विविध साहित्याचं प्रकाशन अशा संधी उपलब्ध
7) डिजिटल माध्यमातही रोजगाराच्या अनेक संधी मिळणार