सगेसोयरे व्याख्येसंदर्भातील नोटिफिकेशनवर मुख्यमंत्र्यांकडून महत्वाची अपडेट

Maratha Reservation: येत्या चार महिन्यात यासंदर्भात कार्यवाही पूर्ण करण्यात येईल, असे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदेंनी सांगितले.

Updated: Mar 16, 2024, 03:26 PM IST
सगेसोयरे व्याख्येसंदर्भातील नोटिफिकेशनवर मुख्यमंत्र्यांकडून महत्वाची अपडेट title=
CM Eknath Shinde On Maratha Reservation

Maratha Reservation:  राज्य शासनाने गेल्या पावणे दोन वर्षांत आतापर्यंत घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये शेतकरी, कामगार, महिला, युवा, ज्येष्ठ नागरिक असे सामान्य जनतेच्या हिताचे लोकाभिमुख निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भावांतर पद्धतीने लाभ देण्यासाठी 4 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सगेसोयरे व्याख्यासंदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेवर हरकती व सूचनांची छाननीची कार्यवाही सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले. याअंतर्गत 4 लाख हरकतींची नोंद आणि छाननी पुर्ण झाली आहे. येत्या चार महिन्यात यासंदर्भात कार्यवाही पूर्ण करण्यात येईल, असे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

आमच्या सरकारने पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत सामान्य नागरिकांच्या हिताचे निर्णय आतापर्यंत पावणे दोन वर्षांत सुमारे 50 ते 60 मंत्रिमंडळाच्या बैठका झाल्या आहेत. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्याची भुमिका शासनाची पहिल्यापासून आहे. त्यासाठी विशेष अधिवेशन घेऊन  मराठा समाजाला 10 टक्के आरक्षणाच निर्णय घेतला. त्याची अमंलबजावणी देखील सुरू असून शासकीय पदभरतीमध्ये त्याचा मराठा समाजातील तरुणांना लाभ होत असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

25 ते 30 दिवसांचा कालावधी लागणार 

राज्यात सगेसोयरे व्याख्यासंदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेवर हरकती व सूचनांची छाननीची कार्यवाही सुरू असून आजपर्यंत 4 लाख हरकतींची नोंद व छाननी पुर्ण झाली आहे. या अधिसुचनेवर एकूण 8 लाख 47 हजार एवढ्या हरकती आणि सूचना प्राप्त झाल्या आहेत.  आहे. उर्वरीत 4 लाख 47 हजार हरकतींची नोंदणी व छाननी करण्याची कार्यवाही सुरू असून त्याकरीता साधारणतः 25 ते 30 दिवसांचा कालावधी लागणार असल्याची माहिती देण्यात आली. 

अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करणार

सामाजिक न्याय विभाग, अन्न व नागरी पुरवठा विभाग, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, दिव्यांग कल्याण विभाग या विभागांकडून या हरकतींची नोंदणी व छाननी या हरकतींची सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही कार्यालयात उपस्थित राहुन केली जात आहे. आता हे कर्मचारी देखील निवडणुक प्रक्रियेमध्ये व्यस्त असतील त्यामुळे त्यांना अवधी लागेल. त्यानंतर अधिसूचनेची मसुदा अंतिम करून विधी व न्याय विभागाची मान्यता घेऊन अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करू असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.मंत्रिमंडळ बैठकीनंतर सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री सर्वश्री धनंजय मुंडे, दीपक केसरकर, संजय बनसोडे यावेळी उपस्थित होते.