'माझ्याविरोधात काहींनी सुपारी घेतली' मनोज जरांगेंचं सरकारविरोधात पुन्हा आंदोलनाचं हत्यार

Maratha Reservation : राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश काढला.. मात्र जोपर्यंत अध्यादेशाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत मागे न हटण्याचा इशारा जरांगेंनी दिलाय. आणि यावरुनच आता नव्या आंदोलनाची हाक मनोज जरांगेंनी दिलीय.

राजीव कासले | Updated: Feb 5, 2024, 07:15 PM IST
'माझ्याविरोधात काहींनी सुपारी घेतली' मनोज जरांगेंचं सरकारविरोधात पुन्हा आंदोलनाचं हत्यार title=

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन संपलेलं नाही असं सांगत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारविरोधात पुन्हा आंदोलनाचं हत्यार उगारलंय. सगेसोयऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी 9 फेब्रुवारीची डेडलाईन दिलीय. नाहीतर 10 फेब्रुवारीपासून जरांगे पुन्हा आमरण उपोषण (Hunger Strike) करणार असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. तर जरांगेंच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्यामुळे आता आंदोलन करण्याची गरज नाही असं आवाहन मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी केलंय..

राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशानंतर (GR) मराठा आरक्षणाबाबतचं आंदोलन जरांगेंनी मागे घेतलं होतं. मात्र सोशल मीडियावरुन जरांगेंविरोधात जोरदार टीका झाली. जरांगेंची फसवणूक झाल्याची ही टीका होती. त्यावरुन आता जरांगे चांगलेच संतापले आहेत. आरक्षण मिळालं तरीही गैरसमज पसरवण्याचे काम होत असल्याचा आरोप जरांगेंनी केलाय. हा कट रचणाऱ्यांची नावं उघड करण्याचा इशारा आता जरांगेंनी दिलाय..

सोशल मीडियावर ट्रॅप रचणाऱ्यांची नाव जरांगे लवकरच उघड करणार आहेत. या संपूर्ण प्रकारानंतर जरांगेंनी पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा दिलाय. सोशल मीडियावर लिहिण्यापेक्षा अंतरवाली सराटीत येऊन कायद्यात बदल सूचवा असं आवाहनही त्यांनी केलंय.  तेव्हा मराठा आरक्षण अध्यादेश काढल्यानंतरही शिंदे सरकारसमोरच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीए.

6 फेब्रुवारीपासुन पुन्हा दौरा
जरांगे पाटील 6 फेब्रुवारीपासून मुंबई, पुणे, नाशिकच्या दौऱ्यावर असणार आहेत. मंगळवारी जरांगे अंतरवाली सराटीमधून निघतील.  त्यांचा आळंदी देवाचीमध्ये मुक्काम असणार आहे. 7 फेब्रुवारीला नवी मुंबईतल्या कामोठेमध्ये सकाळी त्यांचा कार्यक्रम असेल. तर संध्याकाळी दादरमधल्या शिवाजी मंदिरातल्या कार्यक्रमाला जरांगे उपस्थित राहणार आहेत. 8 फेब्रुवारीला सटाण्यात तर 9 फेब्रुवारीला बीडमध्ये जरांगेंचा दौरा असणार आहे. त्यानंतर 10 फेब्रुवारीला अंतरवाली सराटीमध्ये सकाळी 10 वाजता मराठ्यांची बैठक घेऊन जरांगे आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत. 

भुजबळांची टीका
नगरमधल्या महाएल्गार सभेत ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलांवर निशाणा साधलाय....मराठा आरक्षण मिळालं मग आता उपोषण कशाला? असा सवाल त्यांनी केला. अध्यादेश आणि अधिसूचनेतला फरक कळत नाही, अशा शब्दांत त्यांनी जरांगेंना डिवचलं. यावर मनोज जरांगेंनीही भुजबळांना प्रत्युत्तर दिलंय.. तुम्हाला मसुदा कळतो का असा सवाल त्यांनी भुजबळांना केलाय.. कळत नसेल तर मंत्री कशाला होता अशी टीकाही जरांगेंनी भुजबळांवर केलीये.