Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा सहावा दिवस असून जरांगे यांची प्रकृती आणखी खालावली आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची तपासणी करुन त्यांच्यावर उपचार करा.. असे आदेश मुंबई हायकोर्टाने (Mumbai Highcourt) जालना जिल्ह्याच्या शल्यचिकित्सकांना दिले आहेत. जरांगेंच्या उपोषणाविरोधात अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंनी (Gunratna Sadavarte) मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केलीय. त्यावर मुंबई हायकोर्टाने आदेश दिलेत. फक्त सलाईन घेणे म्हणजे उपचार घेणे होत नाही. आणि जरांगेंना उपचार घेण्यात काय समस्या आहे असा सवालही मुंबई हायकोर्टाने जरांगेंच्या वकिलांना विचारलाय जरांगेंच्या प्रकृतीची जबाबदारी कोणाची? त्यांचं काही कमी जास्त झाल्यास डॉक्टर्स जबाबदारी घेणार का? असा सवालही कोर्टाने विचारला. त्यावर आम्ही खात्री देवू शकत नसल्याचं उत्तर जरांगेंच्या वकिलांनी दिल्यानंतर हायकोर्टाने उपचार करण्याचे आदेश दिले.
पाणी पिण्यासाठी विनवणी
नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज यांच्याकडून अखेर जरांगे-पाटलांनी थोडं पाणी प्यायले. महंतांनी पाणी पिण्यासाठी जरांगेंना विनवणी केली, त्यानंतर जरांगेंनी पाणी प्यायले. बुधवारी महंतांच्याच मध्यस्थीनं जरांगेंना बळजबरीनं सलाईन लावण्यात आलं होतं. आताही महंत शिवाजी महाराजांकडून मध्यस्थी करण्यात येतेय. मराठा आरक्षण सगे-सोयरे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जरांगे-पाटील अंतरवाली सराटीत उपोषण करत आहेत. जरांगेंनी पाणी, अन्न आणि औषधोपचारांचा पूर्णपणे त्याग केलाय. त्यांची तब्येत खालावलीय. आजही त्यांनी उपचार करून घेण्यास नकार दिलाय. डॉक्टरांचा हात त्यांनी झटकून टाकलाय. तपासणी करण्यासाठी आलेल्या डॉक्टरांच्या पथकाला त्यांनी माघारी पाठवलंय. जोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत उपचार घेणार नाही असा इशारा जरांगेंनी दिलाय.
भुजबळ यांची टीका
जरांगे आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना आईवरुन शिव्या द्यायला लागलेत, असा त्रागा त्यांनी करू नये, असा टोला भुजबळांनी लगावलाय. तर मनोज जरांगेंनी तब्येतीची काळजी घेऊन उपोषण करावं. टोकांचं आंदोलन करू नये असं आवाहन उदय सामंत यांनी केलंय. 20 तारखेला अधिवेशन होणार आहे. सरकार जरांगेंच्या पाठिशी असून, मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देऊ असं सामंतांनी म्हटलंय.
मराठा समाज आक्रमक
मराठा समाजानं धुळे-सोलापूर हायवे रोखून धरला होता. जरांगेंची तब्येत खालावल्यानंतर मराठा समाज आक्रमक झालाय तेव्हा अंतरवालीत जमलेला मराठा समाज आता रस्त्यावर उतरलाय. मराठा समाजाने धुळे-सोलापूर हायवेवर चक्का जाम केला. मराठा समाजाकडून आरक्षणासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हायवे रोखल्यानं दोन्ही बाजुने गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.