लातूर : मराठा आरक्षण स्थगिती निर्णयाविरोधात एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती देत घटनापीठाकडे खटला वर्ग केला. या निर्णयाविरोधात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. लातूर जिल्ह्यातील एका तीस वर्षीय युवकाने विष प्राषन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
चाकूर तहसील कार्यालयापुढे ही घटना घडली. किशोर गिरीधर कदम असे या ३० वर्षीय युवकाचे नाव आहे. या युवकाला लातूरच्या शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये पुढील उपचारासाठी पाठविण्यात आल्याची माहिती चाकूरचे तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांनी 'झी २४ तास'शी बोलताना दिली. चाकूरमध्ये प्राथमिक उपचार करून त्या युवकाला लातूरच्या शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. यावेळी घटना प्रशासनाला कसल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता केल्याचेही तहसीलदारांनी स्पष्ट केले.
मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संध्याकाळी बोलावली महत्त्वाची बैठक । स्थगिती उठवावी अशी मागणी करणारा अर्ज सरकार सोमवारी करणार सादर । तर लातूरमध्ये मराठा युवकाचा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न https://t.co/Ct4fYeN6GF@ashish_jadhao pic.twitter.com/9fL9uONYdH
— ZEE २४ तास (@zee24taasnews) September 10, 2020
चाकूर तालुक्यातील बोळेगाव येथील या तरुणाने एका बाटलीत विषारी औषध आणले होते. तहसील कार्यालयापुढे येताच त्यांने बाटलीतील विषारी औषध प्राशान केले. याची माहिती तहसील प्रशासनाला काहींनी दिली. विषारी औषध घेतल्यानंतर हा तरुण 'एक मराठा, लाख मराठा', 'आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं' अशी घोषणाही देत होता. त्यानंतर त्या युवकाला तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी चाकूर ग्रामीण रुग्णालयात हलवले. दरम्यान, मात्र आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे आपले आणि मराठा समाजाचे भवितव्य अंधकारमय झाले असल्याची एक चिठ्ठी आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी या तरुणाने खिशात लिहून ठेवली होती.