Maratha Aarakshan Demand Sharad Pawar: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली सराटीमध्ये आंदोलन मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण करथ आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. एकीकडे हे उपोषण सुरु असतानाच नाशिकमधील सकल मराठा समाजाने थेट पत्रकार परिषद घेऊ शरद पवारांनी मराठा समाजाचं नेतृत्व करावं अशी मागणी केली आहे. सकल मराठा समाजाचे नाशिकमधील समन्वयक करण गायकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये मराठा आरक्षणासंदर्भातील वेगवेगळ्या मुद्द्यांसंदर्भात भाष्य करताना शरद पवारांनी ठरवल्यास समाजाला आरक्षण मिळेल असं म्हटलं आहे.
"लोकसभा निवडणूकीनंतर मराठा समाजाच्या मागणीसाठी जरांगे पाटील उपोषण करत आहे. नाशिक जिल्हा त्यांच्या पाठीमागे आहे. आम्हीही त्या लढ्यात सहभागी होत आहोत," असं गायकर यांनी सांगितलं. पुढे बोलताना, "आमदार आणि खासदार यांना सकल मराठा समाजाची विनंती करतो की मराठा समाजाने तुम्हाला संसदेत पाठविलं आहे त्यामुळे अधिकार वाणीने सांगतो की, अंतरवलीला जाऊन लेटरपॅडवर गुन्हे मागे घेण्यासाठी, आरक्षण देण्यासाठी द्यावे. ही तुमची नैतिक जबाबदारी आहे, जरांगे पाटील यांच्यासोबत फोटो काढून तुमची भूमिका दाखवू नका. आंदोलन स्थळी जाऊन पत्र द्या. आंदोलन स्थगिती करण्यासाठी पुढाकार घ्या," अशी विनंती गायकर यांनी केली आहे. तसेच मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास नवनिर्वाचित खासदारांना मतदारसंघात फिरू देणार नाही, असा इशाराही सकल मराठा समाजाने दिला आहे.
"राजकारणात पक्ष फुटल्यानंतर महाविकास आघाडीला सोबत घेऊन स्वत:ला चाणक्य सिद्ध करणारे या देशाचे नेते शरद पवारांना सकल मराठा समाजाची विनंती की त्यांनी मराठा समाजाचं नेतृत्व करावं. त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राजकीय पक्षाच्या नेत्यांना घेऊन अंतरवलीला जावे. मराठा समाजाच्या मागण्याबाबत नेतृत्व करावे. समाजात शरद पवारांचे वेगळे स्थान आहे. तुम्ही ठरवलं तर समाज आरक्षणापासून वंचित राहू शकत नाही. मराठ्यांना न्याय मिळवून द्यावा. असं झालं तर समाज तुमच्या राजकणारणात सोबत राहील," असं सकल मराठा समाजाने शरद पवारांकडे मागणी करताना म्हटलं आहे. तसेच पुढे बोलताना, "असे झाले नाही तर सगळ्या राजकीय पक्षांच्या घरासमोर थाळी नाद आंदोलन केलं जाईल. पहिलं आंदोलन शरद पवार यांच्या घरासमोर करू. ते अशी वेळ येऊ देणार नाही अशी आम्हाला खात्री आहे," असंही मराठा समाजाने म्हटलं आहे.
"2 दिवसांत आंदोलन सोडविले नाहीतर अधिक कठोर भूमिका घेऊ, असा इशारा नाशिक सकल मराठा समाजाने दिला आहे. "एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात पुढाकार घेतला तरी चालेल. जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू असून या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे. सरकारने जरांगे पाटील यांना फसवलं आहे. सगेसोयरे मुद्द्यावरुन समाजाची फसवणूक झाली आहे. लोकसभेत मराठा समाजाचा फटका बसलाय की नाही याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी आत्मपरीक्षण करावे. आमच्या मागण्यांचा विचार करावा, अजूनही वेळ गेली नाही," असं मराठा समाजाने म्हटलं आहे.