Manoj Jarange on Devendra Fadnavis: मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) सध्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यादरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सत्ताधाऱ्यांची, देवेंद्र फडणवीस यांच्या काही आमदारांची इच्छा आहे की रॅलीमध्ये भाजपाच्या काही लोकांना दगडफेक करायला लावायची, गालबोट लावायचं असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
"मराठ्यांचा संयम राहू नये ही सत्ताधाऱ्यांची इच्छा आहे. यांची इच्छा पूर्ण करू नका. त्यांना मराठा समाजाचा संयम नको आहे. आपल्या रॅलींमध्ये त्यांना काहीतरी करून गोंधळ घडवून आणायचा आहे. पण मराठ्यांच्या मध्ये येणं त्यांना खूप जिकीरीचं वाटत आहे. मराठ्यांच्या मध्ये येऊन गोंधळ घालणं आणि पुन्हा त्या गोंधळातून बाहेर निघणं म्हणजे हे खूप मोठं आमंत्रण आहे. त्यांना याचं धाडसच होत नाही," असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
पुढे ते म्हणाले, "नियोजन करतात पण टप्पर होत नाही. मधे गेल्यावर बाहेर निघतो की नाही हे त्यांना माहित नाही. खूप दिवसांपासून धिंगाणा घालायचा, गालबोट लावायचं हे षडयंत्र सुरू आहे. पण इतक्या मोठ्या ताकदीने मराठे त्यांच्या मागे लागतील याचा त्यांना धाक आहे.
त्यामुळे माझी इच्छा आहे आपण संयम धरावा. शांततेने न्याय मिळत असतो".
"देवेंद्र फडणवीस यांचं सरकार फार अवघड आहे. देवेंद्र फडणवीस यांची सत्ता म्हणजे सोपी सत्ता नाही. फार अवघड सत्ता आहे. म्हणून तरी सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र आलेत, म्हणूनच मराठे एकवटले आहेत.. शेवटी त्यांच्या पक्षात असणारा मराठा सुद्धा आता कदरला आहे. ज्या भाजपातल्या मराठ्याच्या आमदारांना आपण मोठं केलं त्यांचा नेता आपल्या जातीच्या विरोधात बोलतोय, षडयंत्र करतोय, सापळा रचतोय. माझ्या विरोधात एसआयटी लावतोय. धाराशिवच्या पोरांनी फक्त घोषणा दिल्यात म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल करत आहे.
हे आता मराठ्यांच्या लक्षात आलं आहे.. हेच आता धनगर बांधवांच्या देखील लक्षात आलंय की आपल्याला देखील यांनी फसवलं आहे. हाच लिंगायत आणि बारा बलुतेदारांचाही प्रश्न आहे", असंही त्यांनी सांगितलं. तुम्हाला य़ा विधानसभेला समजेल की देवेंद्र फडणवीस यांना कोणती किंमत मोजावी लागेल असा इशाराही त्यांनी दिला.