निलेश वाघ, झी 24 तास, मनमाड : चुकीचे उपाचार आणि रिपोर्ट न दिल्याचा आरोप करत रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरला लाथ- बुक्यांनी बेदम मारहाण करीत राडा घातल्याची घटना मनमाडमध्ये समोर आली आहे. जिल्ह्यातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या गांधी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर जिंतेंद्र गांधी यांना मारहाण करून हॉस्पिटलमध्ये साहित्यांची तोडफोड करण्यात आली. मारहाणीचा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून,या घटनेचे मनमाडमध्ये तीव्र पडसाद उमटले आहेत.
मनमाडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या गांधी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर जितेंद्र गांधी हे संध्याकाळच्या सुमारास दवाखान्यात नेहमीप्रमाणे रुग्णांना तपासत होते. यावेळी पाच ते सहा तरुण हॉस्पिटलमध्ये घुसले त्यांनी डॉक्टरांकडे उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या आपले नातेवाईक अनुष्का गरुड या मुलीचे रिपोर्ट आम्हाला द्या अशी मागणी केली.
मात्र डिस्चार्ज दिल्याशिवाय रिपोर्ट देता येणार नाहीत, डिस्चार्ज दिला की रिपोर्ट तुमच्या हाती सोपवले जातील असं डॉक्टर गांधी यांनी मुलीच्या नातेवाईकांना सांगितलं. यावरुन डॉक्टर आणि मुलीच्या नातेवाईकांमध्ये बाचाबाची झाली. संपातलेल्या तरुणांनी अचानक डॉक्टर गांधी यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली.
इतकंच नाही तर या तरुणांनी रुग्णालयातील सामानाचीही मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. अचानक घडलेल्या या घटनेने रुग्णालयातील इतर रुग्ण गोंधळून गेले आणि रुग्णालयात एकच आरडाओरडा सुरु झाला. या हल्ल्यात डॉ. जितेंद्र सुरेश गांधी यांना मुका मार लागला आहे.
या हल्ल्याचा थरार CCTVत कैद झाला असून पोलिसांनी सीसीटीव्हीच्या फुटेजच्या आधारे पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतलं असून काही जणांचा शोध सुरु आहे.
दरम्यान, डॉक्टरवर झालेल्या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील डॉक्टरांच्या संघटनेने या हल्ल्याप्रकरणाची गंभीर दखल घेतली असून डॉक्टर संघटनेने आज पोलीस स्थानकात जाऊन डॉक्टरवर झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवला. तर इंडियन मेडिकल असोसिएशने पोलिसांना निवेदन देत आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.