13 वर्षापूर्वीच्या प्रकरणात कोर्टाने सुनावली शिक्षा; आरोपीने मानले कोर्टाचे आभार

Malegaon News : मालेगाव कोर्टाच्या 13 वर्षापूर्वीच्या प्रकरणात आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्यानंतर अतिरिक्त मुख्य न्यायधीशांनी त्याला ही शिक्षा सुनावली आहे. शिक्षा सुनावल्यानंतर आरोपीनेही कोर्टाचे आभार मानले असून आपल्याला सुधारण्याची संधी दिल्याबद्दल आभार मानले आहेत.

Updated: Mar 3, 2023, 11:57 AM IST
13 वर्षापूर्वीच्या प्रकरणात कोर्टाने सुनावली शिक्षा; आरोपीने मानले कोर्टाचे आभार title=

निलेश वाघ, झी मीडिया, मालेगाव : न्यायालय (Court) आरोपींना (accused) जन्मठेप, सक्तमजुरी, कारावास अशा शिक्षा सुनावते. मात्र मालेगावच्या (Malegaon court) अतिरिक्त मुख्य न्यायधीशांनी एका आरोपीला चक्क 21 दिवस नमाज (namaz) अदा करण्याबरोबरच मशिदीच्या आवारात दोन झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याची अनोखी शिक्षा सुनावली आहे. यातून न्यायालयाने आरोपीला सुधारण्याची संधी दिली आहे.

रिक्षाचालक असलेल्या रुउफ खानचे 13 वर्षांपूर्वी एका दुचाकी चालकाशी भांडण झाले होते. त्यानंतर रऊफने तिघा मित्रांच्या मदतीने दुचाकी चालकाला मारहाण केली होती. याप्रकरणी त्यांच्या विरोधात कॅम्प पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी याप्रकरणात तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. त्यावर अनेक दिवसांपासून सुनावणी सुरू होती. पुरावे व साक्षीदारांनी दिलेल्या साक्षीवरुन रऊफविरोधात कोर्टात गुन्हाही सिद्ध झाला होता. 

मात्र घडल्या प्रकाराचा पश्चात्ताप झाला असून घरची बेताची परिस्थिती आहे. माझी मुले लहान आहेत. तसेच दंड आकारला तर भरण्याची परिस्थिती नाही. त्यामुळे सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा अशी विनंती रऊफने न्यायालयाकडे केली होती.  या विनंतीचा विचार करत मालेगाव न्यायालयाचे मुख्य अतिरिक्त न्यायधीश तेजवंत सिंह संधू यांनी त्याला सुधारण्याची संधी दिलीय.

विशेष म्हणजे सुनावलेल्या शिक्षेचे रऊफ पालन करतो की नाही हे पाहण्यासाठी न्यायालयाने थेट आदेशाची प्रत मशिदीच्या इमामांनाही पाठवली आहे. त्यानुसार रऊफ दैनंदिन फजर,जोहर,असर, मगरिब व इशा अशा पाच वेळी नमाज अदा करतो आहे. त्याच्याकडून वृक्षा रोपन करवून घेण्यासाठी एका कृषी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. रऊफने दोन वृक्ष लावून त्याचे संगोपन सुरु केले आहे. न्यायाच्या मंदिरात झालेल्या या आगळ्यावेगळ्या न्याय दानाची सध्या सर्वत्र चर्चा होतेय. या न्यायालयाच्या निकालाने गुन्हेगार गुन्हेगारी प्रवृत्तीपासून दूर जाऊन धार्मिक कामाला लागला तर काही अंशी गुन्हेगारी कमी होण्यास मदत होईल यात शंका नाही.