...असा होता मराठमोळ्या तरुणाचा जैनमुनी बनण्यापर्यंतचा प्रवास!

मुलगा जैनमुनी झाल्यानं आपणाला आनंद झाल्याचं त्याचे वडील सुहास म्हात्रे यांनी म्हटलंय. 

Updated: Apr 27, 2018, 07:52 PM IST
...असा होता मराठमोळ्या तरुणाचा जैनमुनी बनण्यापर्यंतचा प्रवास!  title=

चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, डोंबिवली : डोंबिवलीतल्या मंदार म्हात्रे या १९ वर्षीय मराठी तरुणाने आज जैन धर्माची दीक्षा घेतली... मराठमोळ्या वातावरणात वाढलेला हा मुलगा जैन मुनी कसा झाला? डोंबिवलीचा मंदार म्हात्रे... पण आता मात्र त्याची ही ओळख कायमची पुसली गेलीय. यापुढं मुनी श्री शेखर विजय महाराज ही त्याची नवी ओळख असणाराय... 19 वर्षांच्या मराठमोळ्या मंदारनं पांडुरंग वाडीतल्या जैन मंदिरात एका दिमाखदार सोहळ्यात जैन धर्माची दीक्षा घेतली... जैन धर्माचे गुरु अभय शेखर सुरीश्वर महाराज यांच्या हस्ते त्याला ही दीक्षा देण्यात आली.  पहाटे साडे चार वाजता सुरू झालेला हा सोहळा सकाळपर्यंत चालला.

मंदारनं आपल्या वस्त्रांचा आणि अंगावरील अलंकारांचा त्याग केला... त्यानंतर सफेद वस्त्र परिधान करत जैन मुनी वेष धारण केला.  यापुढं जैनमुनी म्हणून तो धर्मप्रचाराचं काम करणार आहे. या सोहळ्याच्या वेळी म्हात्रे कुटुंबीय देखील उपस्थित होते. मुलगा जैनमुनी झाल्यानं आपणाला आनंद झाल्याचं त्याचे वडील सुहास म्हात्रे यांनी म्हटलंय. 

मंदार हा आईवडिलांचा एकुलता एक मुलगा... त्याचं सगळं बालपण मराठमोळ्या डोंबिवलीत गेलेलं. तुकाराम नगर भागात वास्तव्याला असलेल्या म्हात्रे कुटुंबियांच्या शेजारी गुजराती जैन समाजाचे लोक वास्तव्यास होते. त्यांच्यासोबत मंदारही जैन मंदिरात जाऊ लागला. १७ वर्षांचा असताना त्याची भेट एका बालमुनींशी झाली आणि त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली... अखेर जैन धर्माची स्वीकार करून त्यानं आयुष्यातल्या नव्या प्रवासाला सुरवात केलीय.