मुंबई : २४ गावं २४ बातम्या या बातमीपत्रात आम्ही तुमच्यासाठी राज्यातील ताज्या घडामोडी घेऊन आलो आहोत. या बातमी पत्रात तुम्हाला आज दिवसभरातील महत्वाच्या बातम्या पहायला मिळतील. पाहूयात २४ गावं २४ बातम्या यामध्ये आज नेमक्या काय बातम्या आहेत...
कर्नाटकमध्ये काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतलाय. आपला पक्ष नेहमीच समविचारी पक्षांसोबत निवडणुक लढवतो, त्यामुळे कर्नाटकमध्ये उमेदवार न देता काँग्रेस उमेदवारांना पाठिंबा देण्याची पक्षाची भूमिका असल्याचं राष्ट्रवादीचे महासचिव डी.पी. त्रिपाठी यांनी सांगितलंय. पुढल्या महिन्यात कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका आहेत.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कणकवली नगरपंचायतीच्या निवडणूकीत नारायण राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला मोठा विजय मिळालाय. नगराध्यक्षपदी राणेंच्या पक्षाचे समीर नलावडे निवडून आले आहेत. नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षानं १७ पैकी १० जागांवर विजय मिळवलाय. भाजपचे आणि शिवसेनेचे ३-३ उमेदवार विजयी झाले आहेत. तर, राष्ट्रवादीचा एक नगरसेवक निवडून आलाय. त्यामुळे राणेंचा स्वाभिमान पक्ष आणि राष्ट्रवादी यांची आघाडी असल्यानं नगरपंचायतीत १७ पैकी ११ सदस्य सत्ताधारी गटाचे असणार आहेत.
जामनेर नगरपरिषदेवर भाजपनं एकहाती सत्ता मिळवलीये. भाजपनं नगराध्यपदासह सर्वच्या सर्व २५ जागांवर विजय मिळवत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी कांग्रेसचा पराभव केलाय. नगराध्यक्षपदी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांचा विजय झालाय.
विरोधी पक्षांनी गोंधळ घालून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाज रोखून धरल्याचा निषेध करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व खासदारांनी दिवसभर उपोषण केलं. पंतप्रधानांनी दैनंदिन कामात व्यग्र राहूनच उपवास केला.
एकीकडे काँग्रेसच्या छोले भटूरे आंदोलनानंतर प्रचंड काळजी घेण्यात आलेल्या भाजपच्या आंदोलनानंतर सँडविचचा व्हिडीओ समोर आलाय. भाजपचे दोन आमदार बाळा भेगडे आणि भीमराव तापकीर यांचा उपवास सुटला. हे दोघे बालगंधर्व रंगमंदिरासमोर सुरू असलेल्या उपोषणामध्ये काही वेळ सहभागी झाले. त्यानंतर हे दोघे डीपीडीसीच्या मीटिंगसाठी काउन्सिल हॉलला पोहचले. तिथे बैठक सुरू झाली आणि प्रथेप्रमाणे समोर प्लेट्स आल्या. सँडवीच, वेफर्स आणि बर्फी असे खाद्यपदार्थ समोर आले. दोन्ही आमदार महोदयांनी त्याचा आस्वाद घेतला आणि उपोषण सुटलं.
बातमी 'झी मीडिया'च्या इम्पॅक्टची. लातूर जिल्ह्याच्या शिरूर अनंतपाळ तालुक्यातल्या तळेगाव बोरीमधल्या शेतक-याची अखेर हरभरा खरेदी होणार आहे. या शेतक-याची हरभरा खरेदी न झाल्यानं त्याच्या मुलीचं लग्न रखडल्याची बातमी झी २४ तासनं दाखवली होती..... झी २४ तासवर ही बातमी पाहिल्यानंतर काही वेळातच राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी भागवत एकुरगे या शेतक-याला बोलावलं आणि त्याला हरभरा खरेदी केला जाईल, असं आश्वासन दिलं.
लातूर जिल्ह्यातील हरभरा खरेदी केंद्र जवळपास दीड महिन्यानंतर का होईना सुरु झाले आहे. जिल्ह्यातील १२ खरेदी केंद्रावर ही खरेदी होणार आहे. २१ हजार ३५८ शेतकऱ्यांनी हरभऱ्याची ऑनलाईन बुकिंग केली होती. आता एसएमएस करून त्यांच्या हरभऱ्याची विक्री होणार आहे. मात्र अद्याप तूरीचीच खरेदी संपलेली नसून जिल्ह्यात अजूनही हजारो शेतकऱ्यांची जवळपास अडीच लाखाहून अधिक तूर विक्री अभावी पडून आहे.
धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढल्याने दर खाली आले. अचानक कांद्याची आवक १८ हजार गोण्यापर्यंत गेल्याने हे दर कोसळल्याने शेतकरी नाराज झाले होते. दोन हजारावर विकला जाणारा कांदा धुळ्यात सरासरी दोनशे ते सातशे रुपये प्रति क्विंटल विकला गेला.
कांदा आणि शेतमलाला हमीभाव जाहीर करावा या मागणीसह पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या वाढत्या दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करून सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध व्यक्त केला. कांदे रस्त्यावर फेकून देत, कांद्याच्या माळा गळ्यात घालून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.
नंदुरबार जिल्ह्यात सकाळ पासून ढगाळ वातावरण होते दुपारी तीन वाजण्याचा सुमारास अक्कलकुवा शहर आणि परिसरात पावसाला सुरवात झाली पाच ते दहा मिनिटे जोरदार पाऊस झाला तर नंदुरबार शहर परिसरात हलक्या सरी कोसळल्या या पावसाचा फटका पपईच्या पिकांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मुरूड तालुक्यावतील फणसाड इथे वन्यजीव अभयारण्यातील सांबराचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
निळवंडे धरणाच्या पाण्यावरुन गेल्या चाळीस वर्षांपासुन निवडणुका लढविल्या जात आहेत आता धरण पुर्ण होवून कालव्यातुन पाणी येण्याची आशा असतांना शिर्डी आणि कोपरगावला बंद पाईपलाईन द्वारे पाणी नेत लाभ क्षेत्रातील शेतक-य़ांना वंचीत ठेवलं जातंय. त्यामुळे संतप्त शेतक-यांनी पाच जिल्ह्यात ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलं.
जम्मू-काश्मिरात पूंछ आणि राजौरी जिल्ह्यात पाकिस्तानने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करत बुधवारी भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. यात औरंगाबाद जिल्ह्याचे वीरपुत्र किरण थोरात यांना वीरमरण आले.
नाशिकातील अनंत कान्हेरे मैदानावर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सकाळी अचानक भेट दिली. त्यामुळे मैदानावर व्यायामासाठी आलेल्या नागरिकांनी आयुक्तांच्या भोवती गर्दी केली होती. यावेळी आयुक्त मुंढे यांनी नागरिकांशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या. यावर लवकर उपाययोजना करणार असल्याचे त्यांनी यावेळी नागरिकांना सांगितले. विषेश म्हणजे नवी मुंबई प्रमाणे नाशिक शहरात देखील लवकरच वॉक विथ कमिशनर मोहीम सुरू करणार असल्याचंही त्यांनी सांगितले.
महागडे मोबाईल चोरी करणार्याद चार युवकांना धुळे शहरातील देवपूर पोलिसांनी अटक केली. या चौघांनी सुमारे साडेतीन लाखांचे २१ चोरीचे मोबाईल पोलिसांच्या स्वाधीन केले.
एका ३० वर्षीय महिलेचे हात पाय बांधून काही महिला तिला बेदम मारहाण करीत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील आसोली गावात हा प्रकार घडलाय.