Maharashtra Weather Update Today : भारत आणि महाराष्ट्रामध्ये सध्या हिवाळ्याला सुरुवात झाली असली तरीही ही थंडी काही अपेक्षित प्रभाव पाडताना दिसत नाहीय. नोव्हेंबर महिन्यामध्ये थंडीनं जोर धरण्यास सुरुवात केलेली असतानाच फेंगल चक्रीवादळामुळं राज्यातील हवामानात मोठे बदल झाले.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या या फेंगल चक्रीवादळाचा परिणाम म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात 7 डिसेंबरपर्यंत हवामान ढगाळ राहील असा इशारा देण्यात आला आहे. दरम्यानच्या काळात यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीसह सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, परभणी, नांदेड या जिल्ह्यांसह लगतच्या परिसरात अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामानात झालेले हे बदल पाहता जवळपास निम्म्या महाराष्ट्राला अर्थात सोलापूर, दक्षिण मराठवाडा ,कोकण आणि मध्य महाराष्ट्राला वादळी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोल्हापूर – 5, 6, 7 डिसेंबर
सातारा – 5 डिसेंबर
लातूर – 5 डिसेंबर
धाराशिव – 5 डिसेंबर
सांगली - 5, ६ डिसेंबर
सोलापूर - 5 डिसेंबर
रत्नागिरी – 5 डिसेंबर
सिंधुदुर्ग – 5 आणि 6 डिसेंबर
पुणे – 5 डिसेंबर
कर्नाटकच्या दिशेनं सरकणारं हे फेंगल चक्रीवादळ आता अरबी समुद्राच्या दिशेनं पुढे सरकत असून, इथंच हे वादळ विरून जाण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. फक्त महाराष्ट्रच नव्हे, तर उत्तर भारतामधील राज्यांमध्येही थंडीचा कडाका कमी झाल्यामुळं महाराष्ट्रातील वातावरणावर याचा थेट परिणाम पाहायला मिळत आहे. सध्या राज्यातील निच्चांकी तापमानातही वाढ झाली असून, हा आकडा सध्या 15 अंशांहूनही अधिक असल्याचं पाहायला मिळत आहे. तर, कमाल तापमानातही वाढ झाल्याचं चित्र आहे.
राज्यातून हिवाळ्याचा प्रभाव कमी होत असतानाच आता ही थंडी नेमकी कधी परतणार याचीच चिंता नागरिकांना लागून राहिली आणि हवामान विभागानं हा मुहूर्तही सांगितला. राज्यात सातत्यानं होणाऱ्या हवामान बदलांमुळे कमी झालेली थंडी आता थेट 8 डिसेंबरनंतर पुन्हा जोर धरण्यास सुरुवात करेल. पुढील तीन ते चार दिवसांनंतर राज्यावरील पावसाळी ढगांचं सावट दूर होणार असून, उत्तर महाराष्ट्रापासून पुन्हा एकदा थंडीची लाट संपूर्ण महाराष्ट्र व्यापताना गिसेल. मुंबई शहर आणि उपनगरांमध्येही काहीसा गारठा जाणवणार असून, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात कडाक्याची थंडी येत्या काळात जोर धरेल अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे.