Maharashtra Weather Updates : महाराष्ट्रात मागील 24 तासांच्या हवामानाचा आढावा घ्यायचा झाल्यास हे चित्र फारसं बदलणार नसून राज्याची दक्षिण किनारपट्टी क्षेत्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावरील भागावर ढगांची चादर पाहायला मिळणार आहे. तर, राज्यावरून अद्यापही पावसाचं सावट दूर झालं नसल्याचंच हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे.
तिथं उत्तर भारतामध्ये कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली असून, दिवसागणिक ही थंडी आणखी तीव्र होत असल्याचं पाहायला मिळत आहे. पुढील 24 तासांमध्ये दिल्ली , हरियाणा, पंजाब या भागांमध्ये थंडी आणखी तीव्र होणार असून, धुक्याची चादर दृश्यमानता प्रभावित करताना दिसेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
महाराष्ट्रातील हवामानाचा आढावा घ्यायचा झाल्यास राज्यातील कोकणासह उत्तर महाराष्ट्रात आकाश निरभ्र असेल. विदर्भात वाऱ्याचा वेग सामान्य राहणार आहे. असं असलं तरीही इथं ढगांचं काहीसं सावटच पाहायला मिळेल. नांदेड, बीड, परभणी, सातारा, सांगली, कोल्हापूर, आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये हवेत गारवा अनुभवता येणार आहे. मध्य महाराष्ट्रावर मात्र पुढील 48 तासांमध्ये चक्राकार वाऱ्यांचा प्रभाव दिसणार असून, त्यामुळं थेट कोकण किनारपट्टीवर याचे परिणाम होताना दिसतील. जिथं, पावसाळी ढगांची दाटी असेल.
हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार हिंदी महासागर, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील पाण्याच्या पृष्ठाचं तापमान साधारण 30 अंशांवर असल्यामुळं यामुळं बाष्पनिर्मिती होत असून, ढगांची निर्मिती होत आहे.
रविवारी दुपारपासूनच वाशिममध्ये ढगाळ वातावरण होतं तर सायंकाळच्या दरम्यान मानोरा तालुक्यात अवकाळी पावसाच्या सरी बरसला. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला. या अवकाळी पावसामुळे काढणीस आलेल्या तूर,कपाशी पिकांसह फळबागा,भाजीपाला,व रब्बीच्या पिकांस फटका बसण्याची शक्यता आहे.तर गहू व हरभरा पिक फुलोरा अवस्थेत असून तूर पिकं काढणीस असल्याने अवकाळी पाऊसामुळं या पिकांचे नुकसान होणार असल्याने शेतकऱ्याची चिंता वाढली आहे.
काश्मीरच्या खोऱ्यात हल्लीच झालेल्या जोरदार बर्फवृष्टीनंतर अखेर जनजीवन पूर्वपदावर येताना दिसत आहे. इथं बहुतांश भागांमध्ये तापमान उणे 2 ते 4 अंशांदरम्यान असून, श्रीनगर आणि गुलमर्ग इथं पारा थेट उणे 8 अंशांवर पोहोचला आहे. या धर्तीवर श्रीनगर - जम्मू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही अंशी विस्कळीत झाली आहे. पंडाब आणि हरियाणासह राजस्थान, मध्य प्रदेशातही थंडीचा कडाका कायम आहे.
तिथं हिमाचल प्रदेशातील नारकंडा, कुफरी, किलाँग इथं बर्फवृष्टीला सुरुवात झाली असून अनेक भागांमध्ये वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर, उत्तराखंडमधील औली आणि चोपटा यांसारख्या भागांमध्येही पर्वतीय क्षेत्र बर्फानं अच्छादल्यानं त्यांच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. पुढील काही दिवस हवामानाची ही स्थिती कायम राहणार असल्याचा इशारा आयएमडीनं देत नागरिकांना सतर्क केलं आहे